Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › कर्मचारी-अधिकार्‍यांमधील वाद उफाळला

कर्मचारी-अधिकार्‍यांमधील वाद उफाळला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : अमोल व्यवहारे

शहर पोलिस दलाच्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावरील 5 लाख रुपयांच्या लुटप्रकरणातील फिर्यादी सहायक फौजदार मारुती राजमाने यांच्या आत्महत्येप्रकरणात पोलिस आयुक्‍तालयामधील कर्मचारी-अधिकार्‍यांमधील वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच कर्मचारी-अधिकार्‍यांनी काही संघटनांना हाताशी धरून आयुक्‍तालयातील अधिकार्‍यांना टार्गेट केले जात असल्याची चर्चा आयुक्‍तालयात होत आहे. एखाद्या कर्मचार्‍याच्या मृत्यूचे आयुक्‍तालयात राजकारण सुरू झाले असल्याची बाब ही आयुक्‍तालयासाठी लाजिरवाणीच म्हणावी लागेल.

पेट्रोल   पंपावरील  इनचार्ज  सहायक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्यानगर, शेळगी) हे 18 मार्च रोजी रात्री 11 च्या  सुमारास  पेट्रोल पंपावरील सुमारे 5 लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना अज्ञात 6 दरोडेखोरांनी राजमाने यांच्याकडील रोकड लुटून नेली. त्यामुळे शहरामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. सहायक फौजदार राजमाने यांनी सांगितलेल्या घटनेप्रमाणे  सुरुवातील हा गुन्हा जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल करुन नंतर तो जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. राजमाने हे प्रत्येकवेळी घटनेचे वेगवेगळे ठिकाण सांगत असल्यामुळे व पोलिसांनी केलेल्या तपासातील बारकाव्यामुळे राजमाने यांच्यावरच संशय बळावत चालला होता

 तपास करणारे पोलिस अधिकारी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नसतानाच सहायक फौजदार राजमाने यांनी 21 मार्चच्या पहाटे जुना तुळजापूर नाका येथील पुलाच्या लोखंडी बारला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पेट्रोल पंपावरील रोकड चोरीच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे.
राजमाने यांनी आत्महत्या केल्यानंतर आता आयुक्‍तालयातील काही कर्मचारी व अधिकारी हे त्यांच्यातील हेवेदावे काढण्यासाठी राजमाने यांच्या आत्महत्याप्रकरणाचा वापर  करीत असल्याचे  दिसून येत आहे. काही संघटनांना हाताशी धरुन राजमाने यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशीची मागणी करून आयुक्‍तालयातील    वरिष्ठ  अधिकार्‍यांना टार्गेट करून त्यांच्यावर दबाव  टाकण्याचा  प्रयत्न काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. निवेदन देणार्‍या संघटनांना पोलिस अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी स्वतःच पोलिस ठाण्यांमध्येच निवेदने तयार  करून  देऊन  ती  पोलिस आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांना  देण्यास  लावली, ही बाब स्पष्ट झाली आहे.

वास्तविक राजमाने यांनी रोकड चोरीची   फिर्याद  दिल्यानंतर  त्यांच्याकडेच   कसून  चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातूनच पेट्रोल पंपावरील भरण्याच्या रकमेसह सुमारे दोन लाख रुपये मिळून आले होते. राजमाने यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेच नव्हते. आत्महत्या करण्यापूर्वीच्या रात्री ते घरीच होते. घरातूनच येऊन त्यांनी आत्महत्या केली. परंतु त्यांच्या आत्महत्येचे आता राजकारण होऊ लागले आहे, हे मात्र नक्‍की. त्यामुळे  पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी राजमाने यांच्या मृत्यूचा वापर करावा, ही बाब आयुक्‍तालयासाठी खूपच लाजीरवाणी बाब आहे. पोलिस दल हे एक कुटुंब आहे म्हणतात. कुटुंबातही हेवेदावे असतात. परंतु एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करून त्याचा वापर आपले हेवेदावे काढण्यासाठी करावा, हा प्रकार निंदनीय आहे.

Tags : Solapur, Solapur News, dispute, employees, officials


  •