Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Solapur › मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही

मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 9:30PMमाळीनगर  : वार्ताहर

मुदत संपल्यावर व्याजासह होणारी रक्कम मागायला गेलेल्या ग्राहकाला त्याच्या मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले.  बँकेने आपल्याला पावती हरविल्याची तक्रार करीत या ग्राहकाने बँकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे.  या  घटनेमुळेे बँकातील ठेवींबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माळीनगर (ता. माळशिरस) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या माळीनगर शाखेत लवंग (ता. माळशिरस) येथील शेतकरी हनुमंत वसंत लोंढे यांना हा अनुभव आला आहे. लोंढे यांनी 3 जानेवारी 2016 रोजी या बँकेत 7.75टक्के व्याज दराने दोन वर्षासाठी 45 हजार रूपये टर्म डिपॉजीट ठेवले होते. त्याची मुदत  3 जानेवारी  2018 रोजी संपली आहे. मुदतीनंतर या शेतकर्‍याला 53 हजार 404 रूपये मिळणे अपेक्षित आहे. या संदर्भातील बँकेची 0413884 या क्रमांकाची ठेव पावती शेतकर्‍यांकडे आहे. मुदत संपल्यापासून बँकेत आपली रक्‍कम मिळावी. यासाठी ते हेलपाटे घालीत आहेत. तुमच्या पावतीची दफ्तरी नोंदच नाही असे सांगून बँकेने हात झटकले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकरी ग्राहकाने शाखाधिकार्‍यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसांत ही रक्‍कम मिळावी. अन्यथा या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी व दिवानी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. याबाबत बँकेकडून लेखी उत्तर देण्यात आले असून यात बँकेच्या रेकॉर्डची पूर्ण तपासणी केल्यानंतर एम.एम.डी.सी. खाते क्र.3528378273 पावती क्र.0413884  दि. 3 जानेवारी  16 चे खाते आमच्या बँक शाखा रेकॉर्डला नाही. त्यामुळे सदर पावतीचे पेमेंट करण्यास असमर्थ आहोत. असे ग्राहकाला सांगण्यात आले आहे.