Sat, Nov 17, 2018 16:41होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात एकही धनगड नाही

पंढरपूर तालुक्यात एकही धनगड नाही

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 11:01PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यात आजवर तहसीलदार कार्यालयातून धनगड (एस.टी. 36) या जातीचा एकही दाखला दिलेला नाही अशी माहिती धनगर समाजाच्या आंदोलकांना तहसीलदारांनी दिली आहे. आज (मंगळवारी) धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयासमोर धनगड दाखवा म्हणत एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांना उत्तर देताना तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी लेखी पत्र दिले असून या पत्रात तालुक्यात धनगड नसल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे.

तत्पूर्वी सकाळी तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतल्यापासून भव्य रॅली काढली. या रॅलीत शाळकरी मुलं, सर्वात पुढं मेंढरे, तसेच मोठ्या संख्येने युवक, जेष्ठ नागरिक सामील झाले होते. 

तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी धनगरी ओव्या आणि पारंपरिक गीते सादर करण्यात आली. या ठिय्या आंदोलनास आ. बबनराव शिंदे,  भगीरथ भालके, जि. प. सदस्या शैला गोडसे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अ‍ॅड. राजेश भादुले, काँग्रेस, तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

पाठिंब्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे  शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी वामनराव माने, चंद्रकात देशमुख,  मोहन कोळेकर यांचेकडे दिले. याप्रसंगी  दिगंबर सुडके,  कृष्णात माळी,  विजय काळे,  गुलाब मुलाणी, रशिद शेख, संदीप मांडवे,प्रशांत घोडके,  अनिता पवार, शहराध्यक्षा रंजना हजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
या आंदोलनास मोठ्या संख्येने सर्वच समाजातील पदाधिकर्‍यांनी भेटून पाठिंबा व्यक्त केला.