Sat, Sep 22, 2018 16:32



होमपेज › Solapur › आर्थिक मागासांकडून शुल्कवसुली नाही!

आर्थिक मागासांकडून शुल्कवसुली नाही!

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 10:04PM



सोलापूर : प्रतिनिधी

शासनाचे आदेश असताना संबंधित महाविद्यालयांकडून ईबीसीधारक (आर्थिक मागास) विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी वसूल केली जात होती. त्यावर सकल मराठा समाज आणि इतर विद्यार्थी संघटनांनी सोलापूर विद्यापीठात ठिय्या आंदोलन केल्यानंतर ईबीसीची फी वसूल करणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्‍वासन सकल मराठा समाज व इतर विद्यार्थी संघटनांना विद्यापीठाने दिले.

शासनाचे आदेश असताना संबंधित महाविद्यालये ईबीसी सवलत विद्यार्थ्यांना देत नाहीत. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, एनएसयुआय विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनांनी सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनाबाहेर गुरूवारी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनावेळी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘जय जिजाऊ’ आदी घोषणा देण्यात आल्या. त्यावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ईबीसीधारक विद्यार्थ्यांना 50 टक्के फी आकारण्याचे आदेश संबंधित सर्व महाविद्यालयांना देणार असून त्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. तसेच ज्या महाविद्यालयांनी ईबीसीधारक विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी वसूल केली आहे. त्यांना 31 जुलै 2018 अखेरपर्यंत उर्वरीत 50 टक्के फी परत द्यावी. तसेच यापुढे ईबीसीधारक विद्यार्थ्यांकडून 50 टक्के फी घेण्याचे आदेश कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले आहेत.

ठिय्या आंदोलनावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, भाऊसाहेब रोडगे, चेतन चौधरी, राजासाहेब शेख, बसवराज कोळी तसेच विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.