Sun, Apr 21, 2019 02:44होमपेज › Solapur › आरोग्य सेवांवर सर्वंकष सामाजिक वचक हवाच!

आरोग्य सेवांवर सर्वंकष सामाजिक वचक हवाच!

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:27PMआरोग्य विश्‍व : बाळासाहेब मागाडे

अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजांप्रमाणे आरोग्य ही सुद्धा एक अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र तातडीच्या व नियमित आरोग्य सेवा प्राप्त करताना सर्वसामान्य रुग्णांची दमछाक होते. ही दमछाक  आर्थिक पातळीवरही जीवघेणी बनताना दिसते. अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा वेळेत व  समाधानकारक मिळाव्यात, यासाठी राज्यभरात जनआरोग्य अभियानास सुरुवात झाली आहे. हे जनआरोग्य अभियान सोलापूरातही सुरू होणार असून त्याबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक सोलापूरात झाली. 

सांगोला येथील अस्तित्व सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक प्रश्‍नांवर नेहमीच आवाज उठवत असते. या संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, कॉम्रेड रविंद्र मोकाशी, शकुंतला भालेराव, डॉ. सुरेश व्यवहारे आदींच्या पुढाकाराने ही मोहीम लवकरच सोलापूरात कार्यरत होणार आहे. पुणे येथे यापूर्वीच अशी मोहीम सुरु झाली आहे. तेथे पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यातूनच सर्व शासकीय व खासगी हॉस्पिटल्सची माहिती संकलित करण्यात आली असून शासकीय आरोग्य योजनांबाबतही प्रबोधन केले जात आहे. यातूनच एक पेशंट डायरी आकारास आली आहे. पुणे येथे याअनुषंगाने प्रभावीपणे काम सुरु आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश हा रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा प्राप्त करून देण्यात पुढाकार घेणे हा आहे. हे अभियान सेवाभावी वृत्तीने चालणार आहे. सोलापूरात अनेक सहकारी रुग्णालयांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून 20 खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असले तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेकदा केवळ कागदोपत्री गोळाबेरीज करून खर्‍या रुग्णांना या सेवांपासून वंचित ठेवले जाते. अनेक शासकीय रुग्णालयांत सोनोग्राफी व तत्सम तपासण्यांसाठी टाळाटाळ करून खासगी लॅबोरटरीचे उखळ पांढरे केले जाते. अर्थात काही दवाखाने अपवाद आहेत. 

मुळात शासकीय दवाखान्यांत असा गोलमाल असेल तर खासगी दवाखान्यांच्या परिस्थितीबाबत न बोललेच बरे. खासगी दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. गरज नसतानाही ‘सेकंड ओपिनियन’चा हक्क डावलून महागडे उपचार घेण्यास भाग पाडले जाते. अशा स्थितीत सर्वसामान्य रुग्ण अधिक नागवला जातो. सर्वसामान्य रुग्णांचे हे नागवलेपण संपवून त्यांना हक्काची आरोग्य सेवा प्राप्त करून देण्यासाठी जनआरोग्य अभियानासारख्या लोकचळवळीची नितांत गरज होती. ती आता पूर्णत्त्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही मोहीम अधिक गतिमान होण्यासाठी सेवाभावीवृत्तीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी यात योगदान देणे गरजेचे आहे. असे झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवेचा मुलभूत हक्क सहजरित्या प्राप्त होईल, यात शंका नाही.