Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › वयात येणार्‍या मुलांच्या संगोपनाचा विषय ऐरणीवर 

वयात येणार्‍या मुलांच्या संगोपनाचा विषय ऐरणीवर 

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 8:50PMगुन्हेगारी विश्‍व : रामकृष्ण लांबतुरे 

जालन्याच्या डॉक्टराच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा गुन्हा सोलापुरात दाखल होतो. त्याच्या दुसर्‍या दिवशी त्या मुलाचा  मृतदेह सोलापुरातील कंबर तलावात आढळून येतो. त्यानंतर केलेल्या चुकीमुळे वडिलांच्या भीतीपोटी मुलाने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. या सर्व बाबींतून पुन्हा एकदा वयात येणार्‍या मुलांच्या संगोपनाचा विषय ऐरणीवर आला आहे.

मातीची भांडी बनवताना आकाराला येते त्यावेळी त्याकडे अधिक पण हळूवारपणे लक्ष द्यावे लागते. त्याचप्रमाणे वयात येणार्‍या मुलांकडेही अशाचप्रकारे लक्ष द्यावे लागते. पहिल्यांदा वयात येणार्‍या मुलाला दूर ठेवून चालणार नाही. मात्र शिक्षण, नोकरी आदी महत्त्वाच्या कारणांमुळे दूर ठेवावे लागले तरी त्याच्यावर विशेष नजर ठेवणे, त्याची साथसंगत, आवडीनिवडी, दिलेल्या पैशाचा वापर कसा करतो यावरही पालकांनी लक्ष ठेवणे बंधनकारक आहे तसेच पालकांचा धाक असावा. मात्र त्यात प्रेमही दिसून आले पाहिजे. काळजीपोटी विचारणा करतात, ही भावना त्यांच्यात निर्माण करण्यात पालकांना यश आले पाहिजे. वयात आल्यानंतर एक मैत्रीचे नाते दृढ झाले पाहिजे. आपणही तरुणाईत अशा चुका केल्या आहेत, मोठा अपराध केला  नाही, या विचारातूनच पाल्यांच्या चुकांकडेही पाहिले पाहिजे. त्याचवेळी तोही पालकांसमोर व्यक्‍त होऊ शकणार आहे. 

जालन्यातील डॉक्टराचा मुलगा दहावीपर्यंत शिक्षणासाठी सोलापुरात नातेवाईकांकडे होता. त्यानंतर चांगले मार्क पडल्याने त्याला दुसर्‍या ठिकाणी  प्रवेश घ्यावयाचा म्हणून दाखला घेऊन परत येण्यास सांगितले. याचवेळी तो रात्री-अपरात्री मित्रांसमवेत बाहेर फिरत असल्याचा एका पोलिसाचा फोन जालन्यात राहणार्‍या वडिलांना जातो. यावर समज देऊन त्याला सोडून देण्यास वडील सांगतात. मात्र रात्र होऊनही तो घरी आला नसल्याची धक्‍कादायक माहिती वडिलांना जाते. काळजीपोटी वडील सोलापूर गाठतात. मित्र, जवळ आसपास शोधशोध घेऊन पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. त्याचनंतर दुसर्‍या दिवशी मुलाचा मृतदेह कंबर तलावात आढळून येतो. पोटचा गोळा हाताला येत असताना अशी कटू घटना पित्याला अनुभवास मिळणे दुर्भाग्याचे म्हणावे लागेल.  वडिलांशी बोलले असता आपला मुलगा तसा नव्हता, वडील म्हणून थोडे रागावले तर असा तो कसा करु शकतो, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करुन हतबल झाल्याचेही पाहावयास मिळाले.