Sat, Jul 20, 2019 03:00होमपेज › Solapur › फिर्यादीचा नातूच निघाला चोरटा

फिर्यादीचा नातूच निघाला चोरटा

Published On: Feb 05 2018 3:48PM | Last Updated: Feb 05 2018 3:48PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील संत तुकाराम चौकातील कोंचीकोरवीनगरातील मार्याम्मा देवीच्या मंदिराची चोरी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आत उघडकीस आणून चोरट्यास  अटक  केली.  त्याच्याकडून 41 हजार रुपये किमतीचा चोरलेला ऐवज जप्त केला.

राजू साग्या मादगुंडी (वय 24, कलिना, मुंबई, सध्या कोंचीकोरवीनगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत नीला राजू मादगुंडी  या महिलेने  दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू मादगुंडी हा फिर्यादी नीला यांचा नातू आहे. तो मुंबईतून सोलापुरात आजीकडे येत असतो. त्यास दारूचे व्यसन असून त्याने ही चोरी दारूसाठी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे.

मार्याम्मा देवीचे मंदिर रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने फोडून मंदिरातील देवीचे चांदीचे दागिने, पितळी समई, तांब्या असा ऐवज चोरून नेला होता. याबाबत  जेलरोड  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कोंचीकोरवीनगरातच  राहणार्‍या  राजू मादगुंडी यास  ताब्यात घेऊन  चौकशी  केली.  त्यावेळी त्याने मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले  आणि चोरलेला ऐवज काढून दिला.

ही कारवाई पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने, पोलिस नाईक दीपक राऊत, सचिन होटकर, सागर सरतापे, सुहास अर्जुन, कपिल पिरजादे यांनी केली.