Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › मंदिर समितीला 2 कोटी 90 लाखाचे उत्पन्न

मंदिर समितीला 2 कोटी 90 लाखाचे उत्पन्न

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:15PMपंढरपूर : प्रतिनिधी

 आषाढी यात्रेवेळी आलेल्या भाविकांकडून श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या चरणी देणगीचे भरभरून दान झाले आहे. तसेच अन्य मार्गाने असे मिळून एकून 2 कोटी 90 लाख 44 हजार 641 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या आषाढीच्या तुलनेत 22 लाख रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. दरम्यान, यात्रेच्या तोंडावर पेटलेले मराठा, धनगर आरक्षण आंदोलनाचा परिणाम आषाढी यात्रेतील मंदिर समितीच्या उत्पन्नावर झालेला आहे. 

15 लाखांवर भाविक येऊनही मागील वर्षीच्या तुलनेत केवळ 22 लाख रुपयांची वाढ उत्पन्नामध्ये झालेली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रेत आषशढ शु. 1 ते आषाढ शु.15 या कालावधीत भाविकांसाठी दर्शन व्यवस्था चांगली राबवण्यात आली. यात्रा कालावधीत सात लाख भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर 11 लाख भाविकांनी मुखदर्शन घेतले. यात्रा कालावधीत भाविकांकडून प्राप्त होणार्‍या निरनिराळ्या देणगी रकमा व अन्य मार्गाने मंदिर समितीस 2,90,44,641 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षी आषाढीत 2 कोटी 68 लाख 96 हजार 514 रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात श्री विठ्ठलाच्या पायावर 36,37,509 रुपये भाविकांनी दान केले आहेत. तर रुक्मिणी मातेच्या पायावर 69,36,24 रुपये भाविकांनी दान केले आहेत. पावतींच्या स्वरूपात देण्यात आलेली देणगी 1,60,12,550 रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्री 50,38,470, राजगिरा लाडू विक्रीतून 5,64,500 रुपये, फोटो विक्री 95,475 रुपये, भक्तनिवास -वेदांत -व्हिडीओकॉन देणगी 316605 रुपये,  नित्यपूजा 150000 रुपये, हुंडी पेटी जमा 1892222 रुपये, ऑनलाईन देणगी 209862 रुपये तर अन्य स्वरुपात 421869 रुपयांची क्रकम जमा झाली आहे. 
दरम्यान आषाढी यात्रेला सुमारे 15 लाख भाविकांनी उपस्थिती लावली. मात्र मराठा, धनगर, कोळी मुस्लीम आरक्षण आंदोलनात मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखण्याचा देण्यात आलेल्या  इशार्‍यामुळे गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भितीपोटी भाविकांनी लवकरच पंढरीतून काढता पाय घेतला.  भाविक आषाढी यात्रेला मोठ्या प्रमाणात आले.

 त्यामानाने मात्र उत्पन्नात म्हणावी त्या पद्धतीने वाढ झाली नसल्याने दिसून येते.2017 साली जेमतेम 8 ते 10 लाख भाविक येऊनही मंदिर समितीला 2 कोटी 68 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा केवळ 22 लाख रुपये वाढ झाल्याने आरक्षण आंदोलनाचा मंदिर समितीला फटका बसल्याचे मानले जाते.