Sun, Mar 29, 2020 08:47होमपेज › Solapur › कोरोनाविरुद्ध लढाईसाठी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र द्यावा

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र द्यावा

Last Updated: Mar 25 2020 9:17PM

संग्रहीत छायाचित्रसोलापूर : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जगासह भारत देशावरील संकट असलेल्या कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी पालिकेसह खासगी शाळांतील शिक्षकांना कोरोनाविरुद्ध लढाईसाठी आपल्या विद्यार्थ्यांना गुरुमंत्र द्यावा, असा उपक्रम दिला आहे.

याबाबत प्रशासनाधिकारी शेख यांनी सांगितले  की, आपण जाणताच सध्या आपला देश एका भयानक संकटाशी झुंजतो आहे. आपल्या सर्व बहाद्दर यंत्रणा यासाठी जीवाचे रान करीत आहेत, मग आपण मागे राहून कसे चालेल?

मला संपूर्ण खात्री आहे की, जेव्हा प्रशासन आपल्याला जी काही जबाबदारी देणार आहे त्यावेळी आपण ती प्राणपणाने, प्रामाणिकपणाने 100 टक्के पूर्ण करणार आहोत; पण तोपर्यंत आपण घरी बसून एक छोटेसे पण लाखमोलाचे काम करावयाचे आहे. ठरावीक वेळेत, दररोज, न चुकता. आपल्याला माहिती आहे की, कोरोनाविरुद्धची लढाई घरात बसूनच जिंकू शकतो. आपण घराबाहेर पडलो तर ही लढाई हरलोच म्हणून समजा. मुलांनी, त्यांच्या पालकांनी घरातच थांबावे यासाठी  आपल्याला हे पुढील प्रयत्न करायचे आहेत. न चुकता, न थकता.

1) आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविणे.
2) या ग्रुपवर मुलांचा अभ्यास आणि कोरोनाबद्दलची जनजागृती. फक्त आणि फक्त एवढेच विषय घ्यायचे आहेत.
3) दररोज सकाळी 10 ते 11 यावेळेत किमान 10 विद्यार्थ्यांना फोन करून खालीलप्रमाणे माहिती द्यावी.
अ) तुझा अभ्यास कसा सुरू आहे, काही अडचणी आहेत का, काही शंका असल्यास विचार, वाटल्यास नंंतर फोन कर.
ब) आपल्याला या सुट्ट्या उन्हाळा/दिवाळीमुळे नाहीत, तर या सुट्ट्या  आहेत कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी. आपण सगळ्यांनी घरात थांबणे म्हणजे कोरोनाविरुद्ध लढणे.  म्हणून तू कुठेही मित्र-मैत्रिणींकडे अजिबात जायचे नाही किंवा त्यांनाही बोलवायचे नाही. कुठल्याही क्लासला नाही, ग्राऊंडवर नाही की बागेतसुद्धा नाही, घरातच थांबणे. कारण घरात थांबणे म्हणजे कोरोनाविरुद्ध लढणे.
क) तुझ्याप्रमाणेच तुझे आई-वडील, बहीण-भाऊ, आजी-आजोबा तसेच घरातील इतर सर्व नातेवाईक यांच्यापैकी कोणीही बाहेर जाऊ नये यासाठीही तू हट्ट करायला हवास.
ड) तसेच तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी दर दोन तासांनी वाहत्या नळाखाली साबणाने 40 सेकंद हात धुवावेत.
इ) खोकताना/शिंकताना रुमालाचा वापर करावा. अशा व्यक्तीपासून किमान 2 मीटर अंतरावर राहावे.
ई) पुढील 10 दिवस आपण घरातच थांबायचे, कोरोनाला हाकलायचे, आम्ही सर्वजणसुद्धा आमच्या घरीच आहोत.
4) दररोज वेगवेगळ्या किमान 10 विद्यार्थ्यांना फोन करावा.
5) आपला अहवाल (फोन केल्याची संख्या ) दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या मुख्याध्यापकांना व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस/फोनद्वारे द्यावा.

‘गुरुमंत्र’ हा उपक्रम सर्व शाळांसाठी अत्यावश्यक असल्यामुळे सर्वांनी अगदी मनापासून सक्रिय सहभागी व्हावे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. याकाळात चुकूनही एकही शाळा सुरू असणार नाही, एकही शिक्षक बाहेर दिसणार नाही. कारण आपण हे सगळे करत आहोत ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, प्राणप्रिय देशाच्या भवितव्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी. आपण सर्वजण सक्रिय सहभागी व्हाल, हीच अपेक्षा.  ‘घरात राहा, दक्ष रहा’, ‘कोरोनाला हाकला, देश वाचवा’, असा उपक्रम दिला आहे.