Sat, Jul 20, 2019 08:54होमपेज › Solapur › मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन रात्री 11 वाजता स्थगित

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन रात्री 11 वाजता स्थगित

Published On: Sep 11 2018 11:02PM | Last Updated: Sep 11 2018 9:45PMपंढरपूर : प्रतिनिधी

 उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकासोबत  सोमवारी रात्री 11 वाजता  बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली तसेच ठोस कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले आहे. 

मराठा आरक्षण मागणीसाठी पंढरपूर येथे  2 ते 9 ऑगस्ट दरम्यान ठिय्या आंदोलन, चक्काजाम  अशी  आंदोलने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आली होती. यादरम्यान काही ठिकाणी एस टी बसेस ना आंदोलन कर्त्यांनी लक्ष केले होते. त्यामुळे आंदोलकांवर पोलीसांकडून कारवाई  करण्यात येत होती. त्यातूनच  अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा गुन्ह्यामध्ये काही जणांना साखळी पद्धतीने गोवण्यात येत होते. तर काहीजणांवर तकलादू पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले . या संपूर्ण प्रकारामुळे समाजातील तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष तयार झाला होता.  या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने  दि 10 सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले.

या आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर   रखूमाई सभागृहात आणून सोडले होते. दुपारी दीड वाजता पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिल्याचे जाहीर केले. मात्र पोलिसांकडून ठोस आश्‍वासन मिळाले नसल्यामुळे तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी चर्चेसाठी न आल्यामुळे संतप्त झालेल्या  कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करीत असल्याचे जाहीर केले. 25 ते 30 कार्यकर्ते रखुमाई सभागृहातून बाहेर यायाला तयार नव्हते.  यामुळे पोलिस प्रशासनापुढे वेगळाच पेच निर्माण झाला होता. पोलिसांनीच कार्यकर्त्यांना रखुमाई सभागृहात आणून सोडले होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय जागेत घूसखोरी केल्याचा ठपका ठेवता येत नव्हता, आणि कार्यकर्ते निघून जाण्यास तयार नव्हते. 

या दरम्यान  तहसीलदार  मधूसूदन बर्गे  यांनी भेट देऊन आंदोलन थांबवावे अशी विनंती केली मात्र तरीही कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. सायंकाळी 8 वाजल्यानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागातही ठिय्या आंदोलन सुरू असल्याचे समजले. आणि मंगळवारपासून या आंदोलनात ग्रामीण भागातूनही सहभागी होण्यासंदर्भातील मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले होते.  यानंतर रात्री 11 वाजता उपविभागीय अधिकारी अधिकारी  डॉ. सागर कवडे व पोलिस निरीक्षक  श्रीकांत पाडुळे हे आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन थांबवण्याची आवाहन केले.आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत व डॉ. कवडे यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असणार्‍या विद्यार्थ्यावरील गुन्हे मागे घेणार, एकही खोटा गुन्हा दाखल होणार नाही,  झालेल्या गुन्ह्यामध्ये तपास करून खोट्या गुन्ह्यातील नावे वगळणार अशी अपेक्षित ठोस आश्‍वासने दिल्याने रात्री 11 वाजता आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले.