Tue, May 21, 2019 18:52होमपेज › Solapur › बाजार समिती संचालकांच्या अर्जांवर आज निकाल शक्य

बाजार समिती संचालकांच्या अर्जांवर आज निकाल शक्य

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या संचालकांच्या अर्जांवर बुधवारी सुनावणी होऊन त्यावर गुरुवारी निकालाची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाने अर्ज दाखल केलेल्या सर्व संचालकांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले असताना एकही संचालक सुनावणीवेळी हजर नव्हता. यावेळी गुन्हा दाखल असलेल्या संचालकांना ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. परंतु,  संचालक न्यायालयात आलेच नसल्याने एकाही संचालकांना पोलिसांना ताब्यात घेता आले नाही.

विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वय 47, रा. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर) यांच्या  फिर्यादीवरून सभापती दिलीप माने यांच्यासह 32 जणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध 14  मुद्द्यांवर बाजार समितीचा विश्‍वासघात  करून बाजार समितीच्या संचालक मंडळाने 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्टोबर 2016 या कालावधीत 39 कोटी 6 लाख 39 हजार 193 रुपयांचे नुकसान केले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात विशेष लेखापरीक्षक काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून गुन्हा दाखल झालेल्या संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश मोराळे यांनी 17 संचालकांना 11 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. 11 जून रोजी अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केलेल्या सर्वच संचालकांच्या अर्जांवर दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद पूर्ण झाल्यानंतर 12 जून रोजी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश हेजीब यांनी सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर करीत 13 जून रोजी सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. बाजार समितीचे सर्व संचालक बुधवारी न्यायालयात हजर होतील, असे गृहीत धरून शहर पोलिसांच्यावतीने सकाळपासूनच जिल्हा न्यायालयात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

बुधवारच्या सुनावणीवेळी आरोपींच्या  वकिलांनी  या   संचालकांना न्यायालयाने फक्‍त 11 जूनपर्यंतच अंतरिम जामीन मंजूर केला होता. 11 जूननंतर अंतरिम जामीन मिळालेला नाही. त्यामुळे अर्जदार न्यायालयात हजर राहण्यासाठी आल्यास त्यांना पोलिस अटक करण्याची शक्यता आहे तसेच यदाकदाचित अर्जदारांचा मूळ अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला तर लागलीच पोलिस अर्जदारांना अटक करतील. त्यामुळे वरील न्यायालयात दाद मागण्याचा त्यांचा हक्‍क बाधित होईल.

त्यामुळे अर्जदारांना अंतरिम जामीन देण्यात यावा तसेच मूळ जामीनअर्जाचा निकाल झाल्यानंतर 5 दिवसांकरिता जामीन देण्यात यावा, असा अर्ज दाखल केला. त्यावर सरकारी पक्षाने जोरदार हरकत घेत आरोपींचा अर्ज कायद्यात बसणारा  नाही. त्यामुळे तो  फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली. त्यामुळे आता संचालकांच्या अर्जांवर आता गुरुवारी निकाल होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी, तर संचालकांच्यावतीने अ‍ॅड. धनंजय माने,  अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे आदी काम पाहात आहेत.