मोहोळ : वार्ताहर
सीना नदीतून चोरुन वाळू उपसा करुन साठा केलेल्या ठिकाणावर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने छापा मारला. यावेळी पोलिसांनी वीस ब्रास वाळु, टिपर, मोटारसायकल सह सुमारे १९ लाख ११ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी गुरुवारी ०६ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यात खरखटणे गावच्या शिवारात ही धडाकेबाज कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ शिवाराती सीना नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. याबाबतची गोपनीय तक्रार पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या विषेश पथकाने गुरुवारी ०६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता खरकटणे येथे मारुती मंदीरा जवळ छापा मारला. यावेळी एका टिपरच्या साह्याने सीना नदीतून चोरलेल्या वाळूची वाहतूक करुन साठा केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाल्याची चाहुल लागताच टिपर व मोटार सायकल जागेवर सोडुन वाळू तस्करांनी पळ काढला.
सदर ठिकाणावरुन पोलिसांनी वीस ब्रास वाळु, एम.एच. १३. ए.एक्स.३४९६ क्रमांचा टिपर आणि एम.एच. १३. बी.वाय ९४८६ या क्रमांकाची मोटार सायकल व एक मोबाईल असा एकुण १९ लाख ११ हजार पाचशेचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर टिपर चालक, मालक, अशा अज्ञात विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक दिपक लुकडे यांच्यासह या कारवाईत उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पो.कॉ. प्रविण बिराजदार, यल्लालिंग तांडोरे, मन्सुर मुल्ला, फुरखान सय्यद, नरेंद्र भोई, हरिदास थोरात, नवनाथ थिटे, लक्ष्मण जाधवर आदिनी सहभाग नोंदविला. या कारवाई मुळे मोहोळ तालुक्यातील वाळू विश्वाला मोठा हादरा बसला असून पोलिस अधिक्षकांच्या पथकाने सलग तिसऱ्या दिवशी मोहोळ तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाले धास्तावले आहेत.