Mon, Aug 19, 2019 18:44होमपेज › Solapur › देशाचा स्वाभिमान, तडवळेचा अभिमान

देशाचा स्वाभिमान, तडवळेचा अभिमान

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 10:58PMवैराग : आनंदकुमार डुरे

आपल्यापासून देशाची सीमा कोसो दूर असली तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले भारतीय जवान देशाच्या संरक्षणार्थ प्राणाची बाजी लावून तेथे उभे आहेत.त्यांच्या या नि:स्सीम त्यागामुळेच आपण इथे निश्‍चिंत आहोत. देशाच्या ह्या सुरक्षेसाठी बार्शी तालुक्यातल्या तडवळे  गावाचाही खारीचा वाटा असून गावातील तब्बल सत्तावीसहून अधिक जवान रात्रंदिवस देशसेवा बजावत आहेत. त्यामुळे जवानांचे गाव म्हणून तडवळे गावाची नवी ओळख बनत असून बहुतांश तरुण सैन्यदलाकडे वळू लागले आहेत.

घरदार सोडून देशाच्या सीमेवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍या जवानांची शौर्यगाथा ऐकल्यावर स्वाभिमानाने ऊर भरून येतो. या स्वाभिमानाचा अभिमान तडवळे गावाने बाळगला आहे. देशाच्या सरहद्दीवर आणि देशाच्या आतमध्ये राहून रक्षण सेवा बजावणारे हे 27 हून अधिक जवान तरुणांचे आदर्श ठरत आहेत. तडवळे गाव मुळातच बार्शी तालुक्यातील शेवटचे गाव, बार्शी, उत्तर सोलापूर आणि माढा या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे गाव वसले असून भोगावती नदीच्या तीरावर विस्तारले आहे. पंचक्रोशीत तडवळे गावाचा लौकिक  चांगला असल्याचे सर्वमान्य आहे. अशा भोगावती नदीच्या कुशीत आणि तडवळे गावाच्या मुशीत जवानांची फौज तयार झाली आहे. कालपर्यंत गावात राहून काळ्या मातेची सेवा करणारी मुले आज सीमेवर भारतमातेची सेवा करीत आहेत. 

पंचेचाळीस वर्षांपूर्वी अभिमान दावणे यांनी सैन्यदलात प्रवेश केला, तर चाळीस वर्षांपूर्वी वर्षकेतू महादेव जाधव आणि लक्ष्मण विश्‍वंभर मदने यांनी कोल्हापूर येथे पी.ए. बटालियन मध्ये सेवा बजावून खर्‍या अर्थाने गावात देशसेवेची मुहूर्तमेढ रोवली.

आज तडवळे गावाचा सैन्यदलात टक्का वाढत चालला आहे. ही क्रांती आजचा तरुण घडवत असून दहावीनंतरच त्यांची तयारी सुरू होत आहे. देशरक्षणाचे बाळकडू मिळालेल्या या जवानांप्रमाणे देशसेवेत जाण्यासाठी अनेक तरुण पहाटे उठून तयारीला लागतात. जिद्द, सातत्य, कष्ट आणि भरतीसाठीची चढाओढ यामुळे या तरुणांमध्ये नवीनच उर्मी पाहण्यास मिळत आहे. अलिशान गाडी, वातानुकुलित कार्यालय, दहा ते पाच काम, गलेलठ्ठ पगार अशी सुखस्वप्ने पाहण्यापेक्षा ऊन, वारा, पाऊस आणि थंडीत देशसेवा करणे त्यांच्यासाठी मानाचे कार्य आहे. 

देशसेवेसाठी सुहास पांडुरंग गिराम व विकास पांडुरंग गिराम हे दोघे सख्खे भाऊ सीमेवर तैनात आहेत.

सैन्यदलात रात्रंदिवस सेवा बजावणारे जवान : सुहास पांडुरंग गिराम, विकास पांडुरंग गिराम, आनंद भाऊसाहेब लोखंडे, नंदकुमार सुरेश माने, कैलास पुरुषोत्तम आवारे, प्रशांत दत्तात्रय नवले, रामदास बब्रुवान पाटेकर, दत्तात्रय भीमराव नवले, बालाजी मोहन वाघ, अतुल मधुकर जाधव, सुलेमान अल्लाउद्दीन मुलाणी, अलिम आब्बास मुलाणी, रामेश्‍वर कालिदास खंडागळे, गणेश पांडुरंग जाधव. मुंबई मेट्रो सुरक्षा बलामध्ये प्रशांत सुग्रीव दावणे. राज्य पोलिस सेवेत : लहू रामचंद्र नवले, भगवंत मोहन वाघ, विजय महादेव वाघ, सुनील उत्रेश्‍वर वाघ, कृष्णात अंबऋषी दावणे, सोमनाथ अभिमन्यू पवार, सचिन विश्‍वनाथ लोखंडे. 

देशसेवा बजावलेले माजी सैनिक : संजय शहाजी आवारे, मोहन शंकर आवारे, बापू विश्‍वनाथ मदने, नामदेव रघुनाथ मदने, चंद्रकांत लिंबा पवार.