Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Solapur › पोलिस अधीक्षक कार्यालयातील ‘ती’ बाहुली हटविली

पोलिस अधीक्षक कार्यालयातील ‘ती’ बाहुली हटविली

Published On: Aug 10 2018 11:56PM | Last Updated: Aug 10 2018 11:06PMसोलापूर : प्रतिनिधी

‘कायद्याची अंमलबजावणी करणारेच अंधश्रद्धेच्या छायेत’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने जागलेपणाची भूमिका ठेवून  बातमीरुपी घाव घातल्यानंतर  लगेच त्याच दिवशी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहाला बांधलेली बाहुली तात्काळ हटविण्यात आली.

संसदेत कायदे तयार होतात. त्याची शेवटच्या तळापर्यंत अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस प्रशासन करते. त्यानुसारच अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आला. मात्र  या कायद्याची अंमलबजावणी करणारेच अंधश्रद्धेच्या छायेत गुरफटल्याचे दिसून येत असल्याने यावर दै. ‘पुढारी’च्या प्रस्तूत प्रतिनिधीने यावर प्रकाश टाकला. 

दै. ‘पुढारी’चा दणका
दै. ‘पुढारी’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच अनेकांनी दै. ‘पुढारी’चे कौतुक केले. अनेक सरकारी कार्यालयांत, पोलिस प्रशासन कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी  आपल्या कार्यालयात असले काही बांधले आहे का, याची तपासणी केल्याचे वृत्तही आले. 

या सभागृहातून अनेक खालपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रवेश केला; मात्र ही बाब कोणालाही खटकली नाही. नव्याने आलेले पोलिस अधीक्षक मनोज पाटील तरी याकडे लक्ष देतील का, असा जाब बातमीतून विचारण्यात आला होता. 

मात्र तसे घडलेही. बातमी प्रकाशित होताच पोलिस अधीक्षक कार्यालयातील यंत्रणा हलली. त्याच दिवशी सभागृहाला लटकविलेली बाहुली तात्काळ काढून टाकण्यात आली. प्रशासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या या घटकाकडून अंधश्रद्धेचे प्रतीक असलेली बाहुली काढून टाकून विषय मिटणार नाही. त्यांच्यात याविषयी निर्माण झालेल्या अंधश्रद्धेच्या गडद छायेतून पोलिस प्रशासनाने बाहेर येण्याची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम पाहणारे सोलापूरचे अ‍ॅड. गोविंद पाटील यांच्यासह शासनाच्या पीआयएमएसचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणारे प्रशांत गायकवाड यांच्यासह अनेकांनी दै. ‘पुढारी’शी संपर्क करुन हे चुकीचे असल्याचे सांगत असला प्रकार सरकारी कार्यालयातून चालतो ही आश्‍चर्याची बाब असून यावर दै. ‘पुढारी’ने प्रकाश टाकल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे अभिनंदन केले. 
पोलिसांनी समाजाच्या मनातील भीती दूर करण्याबरोबर समाजाला निर्भय वातावरण निर्माण करणे अपेक्षित असताना  आपल्याच कार्यालय परिसरात अंधश्रद्धा जोपासल्याचे दै. ‘पुढारी’च्या वृत्ताने कळाल्याचे सांगत अशा वृत्ती थांबवण्याची गरज असल्याचे जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रसारक आणि जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार, प्रसार कार्यक्रम  अंमलबजावणी समितीवर असणारे,  पीआयएमसीच्या सहअध्यक्षपदी असणारे प्रा. शाम मानव यांनीही दै. ‘पुढारी’चे कौतुक केले.

पोलिसांकडून तातडीने कार्यवाही
दै. ‘पुढारी’चे वृत्त वाचल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम पाहणारे आणि शासनाच्या पीआयएमएसचे जिल्हा समन्वयक प्रशांत गायकवाड यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या काळ्या बाहुलीला काढून टाकण्याचे निवेदन दिले. यावर पोलिस उपअधीक्षक आय.एच. अत्तार यांनी बातमी वाचून ताबडतोब ती बाहुली काढून टाकल्याचे प्रशांत गायकवाड यांना सांगितले. त्यांच्याबरोबर एक शिपाई पाठवून खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार खात्री केली असता बाहुली काढून टाकल्याचे दिसले.