होमपेज › Solapur › आपत्कालीन रस्त्यावर उभारण्यात येणारे स्टॉल्स पोलिसांनी हटविले

आपत्कालीन रस्त्यावर उभारण्यात येणारे स्टॉल्स पोलिसांनी हटविले

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:35PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

होम मैदानावर तयार केलेल्या आपत्कालीन रस्त्यावर सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त उभारण्यात येणारे स्टॉल्स पोलिसांनी तातडीने हटविले. सुमारे तीन ते चार स्टॉलधारकांनी या रस्त्यावर मंडप  उभारणी सुरू केली होती. पोलिसांनी त्यावर हरकत घेत रस्त्यावर उभारण्यात आलेले बांबू हटवले. या कारवाईमुळे मंदिर समिती व गड्डा यात्रा समिती पदाधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आपत्कालीन रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला. गड्डा यात्रा काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास या आपत्कालीन मार्गाचा उपयोग करता यावा यासाठी हा रस्ता आपत्कालीन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे असताना मंदिर समितीचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासन यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता; परंतु 2015 सालच्या गड्डा यात्रा काळात या रस्त्यावर स्टॉल्स  लावता आले नाहीत.

होम मैदानावरील आपत्कालीन रस्त्याबाबत येत्या 16 जानेवारीला न्यायाधीश पी. बी. मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. शनिवार, 6 जानेवारीला सुनावणी होती. ती पुढे ढकलण्यात आली आहे. 26 डिसेंबर रोजी सरकारी वकिलांनी मनपातर्फे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आपत्कालीन रस्ता निर्णयाबाबत जिल्हा न्यायालयाला अधिकार आहेत की कसे, याबाबत मत द्यावेत, असा अर्ज दिला होता. त्यावर 2 जानेवारी रोजी प्राथमिक मुद्द्यावर मत मांडणार होते. सरकारी वकील अ‍ॅड. वामनराव कुलकर्णी यांनी 2015 मध्ये ‘यात्रा समिती गट’ तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी समिती नेमली होती. त्यातील मुद्दे काय आहेत हे अभ्यासण्यासाठी वेळ मागितले होता. मात्र काहीच कामकाज न झाल्यामुळे पुढील सुनावणी 16 जानेवारीला  होणार आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा ताफा आपत्कालीन रस्त्याची पाहणी करत फिरत होता.