Fri, Apr 26, 2019 18:15होमपेज › Solapur › यंत्रमागधारकांच्या ‘असंतोषा’ला वाट देण्यासाठी व्यासपीठ!

यंत्रमागधारकांच्या ‘असंतोषा’ला वाट देण्यासाठी व्यासपीठ!

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 10:35PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

गेली अनेक वर्षे संघटना, तसेच शासनाच्या अनास्थेमुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या यंत्रमाग उद्योगाला वाचविण्यासाठी सोलापूर वस्त्रोद्योग व विकास संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. यंत्रमागधारकांमधील खदखद, असंतोषाला वाट देण्यासाठी, तसेच या उद्योगाच्या सर्वांगीण विकासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून हे केंद्र कार्य करणार असल्याचे संस्थापक भालचंद्र बोम्मेन यांनी जाहीर केले आहे. 

सोलापूर शहर गिरणगावानंतर टेक्स्टाईल उद्योगासाठी सुपरिचित आहे. मात्र, अनंत अडचणींमुळे या उद्योगाची अवस्था बिकट बनली आहे. यातून कसेबसे मार्गक्रमण करीत यंत्रमागधारक 
संघर्षाचे जीवन कंठत आहेत. मूलभूतसह विविध सुविधांच्या अभाव असलेल्या या उद्योगाला अतिशय वाईट दिवस येऊन अनेक वर्षे लोटली आहेत. मात्र राजकीय तसेच शासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या उद्योगात मोठा असंतोष आहे. यंत्रमागाशी संबंधित सोलापुरात पाच-सहा संघटना असूनही या संघटनांच्या नाकर्तेपणामुळे या  उद्योगाच्या प्रश्‍नांची सोडवणूक होत  नाही, हे वास्तव आहे. म्हणूनच यंत्रमागधारकांमध्ये या संघटनांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाबद्दल तीव्र असंतोष आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार या उद्योगाच्या प्रश्‍नी उदासीन असताना दुसरीकडे तेलंगणा सरकार सोलापूरच्या यंत्रमागधारकांना खुणावत आहे. यामुळे यंत्रमागधारक संदि:ग्ध आहेत. यासंदर्भात त्यांच्या भावना तसेच असंतोषाला वाट करून देण्यासाठी तसेच या उद्योगाला खरोखरच ‘अच्छे दिन’ आणण्याचा संकल्प काही यंत्रमागधारकांनी केला आहे. भालचंद्र बोमेन या तरूण उद्योजकाने याकामी पुढाकार घेत सोलापूर वस्त्रोद्योग व विकास संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार केला आहे.

‘टेक्ससिटी’चा प्रयत्न करणार

केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश, ध्येयधोरणांबाबत दै. ‘पुढारी’शी बोलताना बोम्मेन म्हणाले, एकेकाळी वार्षिक 800 कोटींची निर्यात असलेला यंत्रमाग उद्योग आज केवळ 200 कोटींवर आला आहे. मनपाकडून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मनपासह विविध करांच्या बोज्याखाली हा उद्योग दबलेला आहे.  सोलापुरात यंत्रमागविषयी पाच-सहा संघटना असूनही या संघटना यंत्रमाग उद्योगाच्या अडचणी, समस्या प्रभावीपणे मांडण्याचे काम करण्यात तसेच प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरल्या आहेत. दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचीही अनास्था असल्याने यंत्रमागधारकांना कोणी वाली नाही, अशी स्थिती आहे. मोठे-लहान कारखानदार असा भेद करून काही संघटनांचे पदाधिकारी केवळ आपला स्वार्थ साधत आहेत म्हणूनच यंत्रमाग उद्योग आज दिशाहीन अवस्थेत आहे.  शासनाच्याविरोधातील असंतोषाला वाट करून देण्यासाठी तसेच यापुढे यंत्रमाग उद्योगाच्या प्रश्‍नांची प्रभावीपणे मांडणी करण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. इरोडच्या धर्तीवर सोलापूर ‘टेक्ससिटी’ घोषित केल्यास या उद्योगाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. यादृष्टीने केंद्र प्रयत्न करणार आहे.