Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Solapur › चित्रातून साकारले विठ्ठलाचे निरागस लोभस रूप 

चित्रातून साकारले विठ्ठलाचे निरागस लोभस रूप 

Published On: Jul 24 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 7:16PMसोलापूर : दीपक होमकर 

‘विठ्ठल’ हा शब्द ऐकताच कटीवर हात ठेवलेला विठ्ठल, पुंडलिकाच्या घराबाहेर त्याची वाट पाहत विटेवर उभा विठ्ठल, सार्‍या संतांना अंगा-खांद्यावर घेतलेला लेकुरवाळा विठ्ठल, डोळे बंद करून ध्यानस्थ असलेला विठ्ठल असे विठ्ठलाचे अनेक विविध रूप तुम्ही पाहिले असतील. मात्र  वयाच्या तिशीतील ऐन तारुण्यातल्या  विठ्ठलाचे लोभस रुप आपण कधीच पाहिले नसेल. मात्र ते सोलापुरात प्रकटले आहे. ही किमया केलीय रंगांचा भक्‍त असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार सचिन खरात याने. 

सचिनच्या कुंचल्यातून आजपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध, कामधेनू, भगवान शंकर-पार्वती, विष्णू, गणपती, भारतीय स्त्री अशी विविध रुपे भारतातीलच नव्हे तर दुबईतील अनेकांनी पाहिली आहेत. मात्र यंदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याने बंगळुरुच्या एका विठ्ठल भक्‍ताच्या आग्रहाखातर एक आगळा-वेगळा विठ्ठल साकारला आहे.  विठ्ठलाचे चित्र म्हणजे पारंपरिक रुपातला कटीवर हात, गळ्यात तुळशीच्या माळा आणि कानात मासोळ्या असणार्‍या विठ्ठलाचे चित्रच आजपर्यंत आपणास माहिती आहे. मात्र संतांनी म्हटलयं  ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ अगदी तीच कन्सेप्ट युवा चित्रकार सचिनने साकारताना तारुण्यातला विठ्ठल कसा असेल हेच प्रत्यक्ष कॅनव्हासवर उतरवलंय.

एरवी डोळे बंद करून ध्यानस्थ असलेल्या विठ्ठलाने या चित्रात मात्र त्याचे डोळे किंचितसे उघडले आहेत. वनसाईड अँगलच्या चित्रातील दिसणार्‍या कपाळावर त्याचा नेहमीचा पांढर्‍या रंगातील टिळा आहेच; मात्र भाळी पिवळा रंग अर्थात त्याच्या तारूण्याच्या ऊर्जेची ग्वाही देतोय. एका कानातील मासोळी स्पष्ट दिसत असताना दुसर्‍या कानातील मासोळी त्याच्या चेहर्‍यासमोर येऊन मासोळीचे महत्त्व प्रतिनिधीत्व जणू विशद करत आहे. चेहर्‍यावर स्मितहास्य असताना त्याच्या गालावर साकारलेल्या रुक्मिणीचे चित्र त्याच्या तना-मनात असलेल्या रुक्मिणीचा वास सांगत आहे.