Sat, Sep 22, 2018 18:29



होमपेज › Solapur › पंढरपूरचे पासपोर्ट केंद्र मेमध्ये कार्यान्वित होणार

पंढरपूरचे पासपोर्ट केंद्र मेमध्ये कार्यान्वित होणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सोलापूर : श्रीकांत साबळे

येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 नवी पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार असून यामध्ये पंढरपूर येथील सेवा केंद्राचाही समावेश असणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या तत्त्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 251 पासपोर्ट केंद्रे उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात 7, तर देशभरात 173 पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू झाली असून दुसर्‍या टप्प्याअखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 केंद्रांसह देशभरात 251 पासपोर्ट सेवा केंद्रांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

नवीन 13 पासपोर्ट सेवा केंद्रे

‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्रे सुरु होणार आहेत. ही केंद्रे सिंधूदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड आणि जळगावचा समावेश आहे.

गेल्या वर्षभरात राज्यात नवीन 7 पासपोर्ट सेवा केंद्रे

जानेवारी 2017 पासून सुरु झालेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार एप्रिल 2018 अखेरपर्यंत दोन टप्प्यात एकूण 251 पासपोर्ट सेवा केंद्रे उघडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे सुरु झाली आहेत.

तिसर्‍या टप्प्यात राज्यात उर्वरित पासपोर्ट सेवा केंद्रे

देशात दर 50 कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून 2018-19 या वित्तीय वर्षात ‘पासपोर्ट तुमच्या दारी’ या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उर्वरित ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळे देशातील सर्वसामान्य माणसाला पासपोर्ट मिळणे सहज शक्य होणार असल्याचा विश्‍वासही डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.

Tags : Solapur, Solapur News, passport, center, Pandharpur, operational, May






  •