Sun, Apr 21, 2019 06:05होमपेज › Solapur › विठ्ठलराव कारखान्याचे शासकीय भागभांडवल जमा

विठ्ठलराव कारखान्याचे शासकीय भागभांडवल जमा

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 10:53PMमाढा : वार्ताहर

माढा तालुक्यातील आ. बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने त्यांच्याकडे असलेले उर्वरित शासकीय भागभांडवल एकरकमी शासनजमा केल्याचे वृत्त आहे. यामुळे आता या कारखान्यावर शासननियुक्‍त संचालक म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांची वर्णी लागणार की नाही, याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा झाल्याने शासनाचे भागभांडवल असणार्‍या संस्थांच्या संचालक मंडळावर शासननियुक्‍त प्रतिनिधी नेमण्यात येतो. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्यास शासनाकडून साखर कारखाना व सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 22 कोटी 12 लाख  6 हजार रुपये इतके शासकीय भागभांडवल मिळाले होते. त्यापैकी 31 मार्च 2017 या अहवाल वर्षाअखेर 14 कोटी 74 लाख 95 हजार रकमेचा भरणा कारखान्याने शासनाकडे केला होता. उर्वरित शासकीय भागभांडवलापैकी  7 कोटी 37 लाख 10 हजार 900 रुपये इतकी रक्‍कम कारखान्याकडे येणे बाकी होती. त्या संपूर्ण रकमेचा भरणा चार चलनाद्वारे शासनाकडे कारखान्याने केला आहे. 

या कारखान्यावर शासननियुक्‍त संचालक नेमण्यात येणार होता. त्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांचे नाव शासनाच्या सहकार खात्याकडून निश्‍चित करण्यात आले होते. याविषयी सहकार खात्याकडून आवश्यक ती माहिती पत्रव्यवहाराद्वारे घेतली जात होती. संजय कोकाटे हे भाजपचे तालुकाध्यक्ष असून ते सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे समजले जातात. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे ते निकटवर्तीय आहेत. माढा तालुक्यात आ. बबनराव शिंदे यांचे ते कडवे विरोधक आहेत. या कारखान्यावर कोकाटे यांची वर्णी लागावी यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे खास प्रयत्न करत होते.  कोकाटे यांची नियुक्‍ती होणार असल्याच्या शासन स्तरावरील हालचाली व पत्रव्यवहार या पार्श्‍वभूमीवर आता विठ्ठलराव शिंदे कारखान्याने शासनाचे सर्व भागभांडवल परत केले. यामुळे कोकाटे यांची नियुक्‍ती होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.