Sun, Jul 21, 2019 02:05होमपेज › Solapur › ‘येरे...येरे...पावसा...’ शेतकर्‍यांची आर्त हाक

‘येरे...येरे...पावसा...’ शेतकर्‍यांची आर्त हाक

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:14PMसोलापूर : संतोष आचलारे

जुलै महिना सरुन ऑगस्ट महिना आला तरीही जिल्ह्याभरात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात सापडली आहेत. येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी न घेतल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने ‘येरे...येरे...पावसा...’, अशी आर्त हाक शेतकर्‍यांकडून दिली जात आहे. पावसाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. 

यंदा जून महिन्यात झालेल्या जेमतेम पावसाच्या भरोशावर शेतकर्‍यांनी सरासरी क्षेत्राच्या सुमारे दुप्पट खरीप पिकांची पेरणी केली आहे. गत 20 दिवसांपासून जिल्ह्याभरात पाऊसच गायब झाल्याने खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.

 तूर, उडीद, सोयाबीन, मूग, मटकी यासारख्या हलक्या व कमी ताकदीच्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने या पिकांमधील ताकद कमी होत पिकांत रोगांचा प्रादूर्भाव होत आहे. उडीद पिकावर तर संपूर्ण मावा रोगाचा विळखा पडल्याने या रोगाचा नायनाट करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. तरच उडीद यंदा शेतकर्‍यांच्या पदरी पडण्याची शक्यता आहे. 

मध्यंतरी एक दिवस पडलेल्या भीज पावसाने खरीप पिकांना संजीवनी मिळाली गेली होती. या पावसानंतर पिकांत तणांची मोठी वाढ झाल्याने शेतकर्‍यांनी खुरपणी व कोळपणी करुन पिकांमधील तणांचा बंदोबस्त केला आहे. मोठ्या शेतकर्‍यांनी बैलांच्या सहाय्याने कोळपणी करुन तणांचा बंदोबस्त केला आहे, तर अल्पभूधारक शेतकर्‍यांनी महिला मजूर खुरपणीसाठी लावून एकरी पाच हजार रुपयांचा खर्च केला आहे. 

बियाणे खरेदी, खतांची खरेदी व पेरणीचा खर्च केल्यानंतर शेतकर्‍यांनी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा खर्च केला आहे. इतका खर्च केल्यानंतरही पिकांत पावसाअभावी जीव नसल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला पडला आहे. येत्या दोन- तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर पिकांची वाढ रोखून उत्पादनात मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाकरिता ग्रामीण भागातील सर्वच गावांत ग्रामदैवतांना साकडे घालण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. 

शेतकर्‍यांना पीक विमा योजनेसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. मात्र ही मुदतही संपत आली आहे. डिजिटल सात/बारा उतार्‍याच्या मोहिमेमुळे तलाठीवर्गाकडून शेतकर्‍यांना उतारा देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी विलंब होत आहे. अशापरिस्थितीत किमान 15 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशीही मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. 

आतापर्यंत केवळ सरासरीच्या निम्म्याच सरी...
सोलापूर जिल्ह्याभरात जून व जुलै या दोन महिन्यांच्या काळात सरासरी एकूण 2233 मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असतो. यंदाच्या वर्षी याकालावधीत केवळ 1207 मि.मी.च पाऊस पडला गेला आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा केवळ 53 टक्केच पाऊस पडला असल्याने यंदा सरासरीच्या निम्म्याच सरी कोसळल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसून येत आहे. खरीप पिकांच्या वाढीची हीच अवस्था असून येत्या दोन-चार दिवसांत पाऊस न पडल्यास खरीप पिके कायमची खाली माना घालणार आहेत, हे मात्र निश्‍चित आहे.