Sat, Apr 20, 2019 10:14होमपेज › Solapur › पालकमंत्र्यांवर कुरघोडीसाठी सहकारमंत्री गटाचे निवेदन नाट्य

पालकमंत्र्यांवर कुरघोडीसाठी सहकारमंत्री गटाचे निवेदन नाट्य

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 11:12PMसोलापूर ः प्रशांत माने

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पालकमंत्री व सहकारमंत्री गटांच्या नगरसेवकांमध्ये पेटलेले राजकारण काही केल्या विझत नसून मुख्यमंत्र्यांच्या महापालिका बरखास्तीच्या तंबीनंतरही वाद सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी सायंकाळी सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन पोलिस आयुक्‍तांना दिले. 

जिल्ह्याचे पालकत्व आपल्याच पक्षाकडे असताना  सहकार मंत्री गटातील नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन शहरात बोकळलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस खात्याची तातडीची  बैठक लावणे गरजेचे होते. परंतु त्यांनी थेट पोलिस आयुक्‍तांकडे निवेदन देणे म्हणजे सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले सोलापूरचे दोन मंत्री देशमुखांमधील वाद हा आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाद मिटवण्यासाठी मागे एकदा मध्यरात्री सोलापूरच्या सर्व भाजप नगरसेवकांसह दोन्ही मंत्र्यांना मुंबईत वर्षावर पाचारण करून वाद मिटवा अन्यथा महापालिका बरखास्त करीन, अशी तंबी दिली होती. तरीदेखील हा वाद मिटलेला नाही. नुकतेच सोलापूर दौर्‍यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे काही नगरसेवक व भाजपच्या  जुन्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मंत्र्यांमधील वाद मिटवा, अशी विनंती प्रदेशाध्यक्षांना केली होती. परंतु प्रदेशाध्यक्षांनी तक्रार करणार्‍यांनाच बजावले की, दोन्ही मंत्र्यांत वाद आहे ते माहिती असून ते सांगू नका तर त्यावर तोडगा काय ते सूचवा. यावरूनच असे स्पष्ट होते की, प्रदेशाध्यक्षदेखील दोन्ही मंत्र्यांमधील वाद मिटवण्यास हतबल आहेत.

राज्यातील सत्तेत येऊन भाजपला चार वर्षे लोटत आली असून पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. निवडणुका तोंडावर आल्यानंतरदेखील हा वाद मिटत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील मंत्री गटाच्या नगरसेवकांमधील कुरघोडीचे राजकारण पुन्हा पेटताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सक्षम असतानाही सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलिस आयुक्‍तांना दिलेले निवेदन म्हणजे पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह  लावणारे आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच शहरात अवैध धंदे  बोकाळल्याचे आणि ते बंद करण्याचे निवेदन देतात म्हणजे यावरून भाजपची सत्ता असतानाही शहरात अवैध धंदे सुरू असल्याकडे बोट दाखवणारे आहे.

पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्यावर सोलापूरचा विकास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. परंतु सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा आपल्या दोन्ही मंत्र्यांवर विश्‍वास नसल्याचे दिसत आहे. कारण शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांबाबत दोन्ही मंत्र्यांकडे तक्रार करून पोलिस खात्याची मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांना हा गंभीर विषय मार्गी लावता आला असता. 

परंतु भाजपमधील जबाबदार पदाधिकारी शहराध्यक्ष यांच्याच उपस्थितीत नगरसेवक आणि भारतीय जनता युवामोर्चाच्या शहर पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्‍तांना अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन देऊन दोन्ही मंत्र्यांमधील आणि नगरसेवकांमधील वाद चव्हाट्यावर आणला आहे.