Tue, May 21, 2019 12:10होमपेज › Solapur › कठुआप्रकरणी मुस्लिमांचा महाआक्रोश मोर्चा, धरणे

कठुआप्रकरणी मुस्लिमांचा महाआक्रोश मोर्चा, धरणे

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील कुल जमात तंजिमतर्फे देशात मुलींवर व महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात  शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिमांचा महाआक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.या धरणे आंदोलनास शहरातील विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला.  सर्वधर्मीय महिला व पुरुष मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. कुल जमात तंजिमतर्फे महाआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. जमाततर्फे सांगितले की, भारतात मागील काही वर्षांपासून दलितांवर व अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार वाढले आहेत.विकृत झालेल्या समूदायाकडून हल्ले वाढले आहेत.

सहिष्णू व मानवतावादी तथा विवेकवादी भारतीय समाजाच्या इतिहासाला या घटना लांच्छनास्पद आहेत. या घटनांचा तीव्र  निषेध करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.जानेवारी महिन्यात जम्मू  येथे आदिवासी समाजातील एका आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन नराधमांनी सातत्याने आठ दिवस बलात्कार केला होता. त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी जम्मू-काश्मीर राज्यातील काही मंत्र्यांनी या घटनेतील आरोपींना पाठबळ देण्यासाठी आंदोलन करण्याचे नृशंस प्रयत्न केले.तसेच तपास करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेला प्रभावित करण्याचा प्रयत्नसुध्दा करण्यात आला. यानंतर सुरत, उन्नाव, सासाराम येथील घटनांमध्ये विकृत मानसिकतेच्या नराधमांनी अमानवीय कृत्य केले. याठिकाणीदेखील प्रशासकीय यंत्रणेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याविरोधात सोलापूर शहरातील कुल जमात तंजीमतर्फे शुक्रवारी दुपारी 2.30 ते सायं. 5 पर्यंत महाआक्रोश धरणे आंदोलन ठेवण्यात आले होते. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व मधुरा  माशाळकर, शिफा शेख, पालवी कांबळे, सादिया शेख, उजमा शेख, नजा शेख, जोया नदाफ, समा शेख, अफनान कोतिंबीरे या लहान मुलींनी केले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला  व्यासपीठावर किंवा माईकवर बोलण्याची संधी देण्यात आली नाही.सर्व समाजातील महिलांनीदेखील या महाआक्रोश मोर्चात आपला सहभाग नोंदविला होता. लहान बालकांपासून ते आबालवृध्दांपर्यंत मोठ्या संख्येने सर्व  समाजातील लोक यामध्ये सहभागी झाले होते.

कठुआ, उन्नाव, सुरत, सासाराम येथील नराधमांना फाशी द्या अशा मागण्यांचे फलक घेऊन, तोंडाला काळी पट्टी बांधून युवकांनी  व  महिलांनी आपला निषेध नोंदविला.काहीजणांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे परिधान केले होते.पडितांना न्याय द्या व गुन्हेगारांना फाशी द्या, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. व्यासपीठावर मौलाना हारीस यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले, तर मौलाना इब्राहिम यांनी प्रस्तावना केली. सरफराज शेख यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना वाचून  दाखविली व आलेल्या उपस्थितांकडूनदेखील भारतीय राज्य घटना म्हणवून घेतली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी व संघटनांनी आपला पाठिंबा घोषित करत असल्याचे पत्र या लहान मुलींकडे दिले.

Tags : Solapur, march, Muslims, against,  Kathua, incident