Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Solapur › तोट्यातील परिवहन समिती सदस्यांच्या मानधनात दुपटीने वाढ

तोट्यातील परिवहन समिती सदस्यांच्या मानधनात दुपटीने वाढ

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी 

अनेक वर्षांपासून डबघाईला आलेल्या तोट्यातील महापालिका परिवहन समितीला फायद्यात येण्यासाठी विविध मदतीची आणि काटकसरीने वागण्याची गरज असताना समितीच्या सदस्यांनी मात्र त्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याची मागणी केली. 

महापालिकेच्या परिवहन समितीची शुक्र्रवारी सभा झाली. त्यावेळी हा प्रस्ताव सादर करण्यात आला.  अध्यक्षस्थानी सभापती तुकाराम मस्के हे होते. सभेमध्ये एकूण सात विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

सन 2017-18 या आर्थिक वर्षात त्यांच्या मानधनासाठी तीन लाख रुपये तरतूद होती. यंदाच्या वर्षी सहा लाखांची तरतूद सुचविण्यात आली आहे.  त्यानुसार सदस्यांसाठी प्रतिमहा 4 हजार रुपये मानधन वाढ देण्याचा व प्रति सभा उपस्थिती भत्ता शंभर रुपये अदा करण्याच्या परिवहन व्यवस्थापकांच्या टिपणीनुसार आलेल्या प्रस्तावावर  निर्णय घेण्यात आला.

परिवहन बसमधून प्रवास करणार्‍या सर्व बस प्रवाशांचा विमा उतरविणार असून त्यासाठी तिकिटामध्येच एक रुपयाचा अधिभार लावण्यात येणार आहे. मात्र, बसचा अपघात झाल्यास अपघातग्रस्त जखमी व मृत झालेल्या प्रवाशांना त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे.

सिटी बसमधून प्रवास करताना बसचा अपघात झाला व त्यामध्ये प्रवाशाचा अथवा चालक-वाहक जखमी किंवा मरण पावल्यास त्या प्रवासाचे नातेवाईक व कामगारांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात दावे दाखल करण्यात  येतात. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाला भरपाई द्यावी लागते. सध्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने व वेळेवर भरपाई न दिल्याने भरपाईची रक्कम व्याज व दंडासह देण्याचा भुर्दंड परिवहनवर पडतो. त्यामुळे परिवहन उपक्रमाला अशाप्रकारे बोजा पडू नये तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची हमीही होईल यादृष्टिकोनातून विमा उतरविण्याच्या या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
  परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाला तपासणीसाठी दोन जीप वाहन खरेदी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीमधील सेवेवर असलेल्या कामगारांना त्यांच्या घरापासून कामासाठी जाताना व येताना 50 टक्के सवलतीचे पासेस देण्याचाही प्रस्तावास मंजुरी दिली. 

परिवहन उपक्रमात असताना गिरीश अंटद  यांच्यावर सदोष बसेस खरेदीप्रकरणी गंभीर आरोप आहेत.त्यांना पालिकेकडे का वर्ग केले, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. अंटद यांना पुन्हा परिवहनकडे घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. पुढील परिवहन समितीच्या सभेत प्रस्ताव सादर करण्याची सूचना सभापती मस्के यांनी प्रशासनाला केली आहे.

हद्दवाढ भागात पाच ते दहा रुपयांत जनता बस
शहर व हद्दवाढ भागात सध्या तीन आसनी रिक्षातून  प्रवासी वाहतूक जोरात सुरु आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी आता शहरातील मुख्य मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 5 व 10 रुपये  भाडे आकारून कमी दराने जनता बस सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. सभेमध्ये एकूण सात विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाला तपासणीसाठी दोन जीप वाहन खरेदी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.