Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Solapur › बसवेश्‍वर स्मारकाचा आराखडा शासनाला सादर

बसवेश्‍वर स्मारकाचा आराखडा शासनाला सादर

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

महात्मा बसवेश्‍वरांचे स्मारक मंगळवेढा येथील कृषी विभागाच्या 65 एकर जमिनीवर होणार असून त्यासाठीचा डीपीआर तयार करून शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

बसवेश्‍वरांचे वास्तव्य असलेल्या मंगळवेढानगरीत त्यांचे भव्य स्मारक उभारणार असून, यासाठी कृषी विभागाची 65 एकर जमीन निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामध्ये 15 एकरांमध्ये स्मारक आणि उर्वरित 50 एकर जमिनीवर कृषी पर्यटन उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाची संख्या मोठी असल्याने सोलापूर जिल्ह्यात महात्मा बसवेश्‍वरांचे स्मारक व्हावे, अशी मागणी बर्‍याच दिवसांपासून होती. यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने बैठका घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. 

त्या स्मारकाला आता लवकरच अंतिम रूप येणार असून त्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकार्‍यांना मिळालेल्या सूचनेनुसार यासंदर्भात नुकतीच संबंधित अधिकार्‍यांची आणि विभागाची बैठक घेण्यात आली असून त्यासाठीचा डीपीआर बनविण्यात येणार असून तो शासनाला तत्काळ सादर करण्यात येणार आहे.त्यांनतर निधीची तरतूद होणार आहे. त्यामुळे स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली आहे.