होमपेज › Solapur › सराफी दुकान फोडले

सराफी दुकान फोडले

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 10:50PMसोलापूर : प्रतिनिधी

येथील महिंद्रकर ज्वेलर्स हे सराफ दुकान शनिवारी पहाटे फोडण्यात आले.  अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 34 हजार 750 रुपयांचा सोने-चांदीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

दाजी पेठ, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, गाळा नं. 4, पद्मशाली चौक येथील महिंद्रकर ज्वेलर्समध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद सूर्यप्रकाश हिरालाल महिंद्रकर (वय 42, रा. दाजी पेठ, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, पद्मशाली चौक, सोलापूर) यांनी दिली आहे. यामध्ये अज्ञात चोरट्याने महिंद्रकर ज्वेलर्सच्या दुकानाबाहेरील ग्रील वाकवून, दुकानाचे शटरचे दोन्हीकडील कुलूप-कोयंडे तोडून दुकानात प्रवेश केला. या चोरीत 35 हजार 500 रुपयांचे सोन्याचे पदक, 12 हजार 500 रुपयांचे फॅन्सी मिनी सोन्याचे गंठण, 27 हजार 500 रुपयांचे बंगाली डिझाईन असलेले आयरिंग, 30 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 37 हजार 500 रुपयांचे सोन्याचे टॉप्स, 25 हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस व सोन्याची कर्णफुले, सोन्याची बाळअंगठी, चांदीचे जेंटस् ब्रेसलेट, पैंजण, वाळे, जोड, कडली आदी नग असे एकूण तीन लाख 34 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल चोरण्यात आलेला आहे. घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक काळे, अभंगराव व दांडगे यांनी भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभंगराव हे करत आहेत.