Wed, Jun 03, 2020 03:45होमपेज › Solapur › मंगळवेढा : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माजी सैनिकांना घेतले ताब्यात

मंगळवेढा : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माजी सैनिकांना घेतले ताब्यात

Last Updated: Oct 10 2019 1:14PM
मंगळवेढा (सोलापूर) : तालुका प्रतिनिधी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी मुख्यमंत्र्यांची सभा होणार असून सभेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कारणावरून मंगळवेढा तालुक्यातील माजी सैनिकांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा संपल्यानंतर त्यांना चहापान करून सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंढरपूर येथील पंचायत समितीच्या सभेमध्ये विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली होती. याशिवाय विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन देखील करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक यांचे चुलते सुधाकरपंत परिचारक यांना भाजपकडून पंढरपूर विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मतदारसंघांमधील सैनिकांमध्ये असंतोष वाढला आहे. 

तसेच महाजनादेश यात्रेच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाई फेकणे, कोंबड्या फेकणे निषेधासाठी काळे झेंडे दाखवले असे प्रकार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिस स्टेशनकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान अशा प्रकारामुळे मंगळवेढा तालुक्यात खळबळ माजली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्यातील काही माजी सैनिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आहे. सभा संपल्यानंतर त्यांचा पाहुणचार करून त्यांना सोडण्यात येईल.  - उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील.

संघटनेकडून आंदोलन केले जाईल या भीतीपोटी पोलिसांनी आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये बोलवून आंदोलन किंवा निवेदन न देण्याबाबत सुचना दिली. तासभर थांबून नंतर सोडून देण्यात आले आम्ही आमचे काम मतपेटीतून व्यक्त करू.  - तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मंगळवेढा श्रीमंत केदार