होमपेज › Solapur › पंढरपुरात भाजीपाला विक्रेत्यांचा मोर्चा

पंढरपुरात भाजीपाला विक्रेत्यांचा मोर्चा

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 10:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

नगरपालिकेने रस्त्यावर बसणार्‍यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शुक्रवारी संतप्त विक्रेते आणि शेतकर्‍यांनी नगरपालिकेत भाजीपाला टाकून जोरदार घोषणाबाजी करीत पालिका मुख्यालय दणाणून सोडले.  

पंढरपूर शहरात भाजीपाला विक्रेते व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने जागेअभावी रस्त्याच्या कडेला बसत  आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून नगरपालिकेने या विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून त्यांचा भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी शुक्रवारी भाजीपाला घेऊन नगरपालिकेच्या मुख्यालयात मोर्चा आणला.

यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकारीही गैरहजर होते. शेकडोंच्या संख्येने आलेल्या  महिला आणि पुरुषांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून मुख्यालय दणाणून सोडले. मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोर भाजीपाला यांचा सडा पडला होता. एकही अधिकारी समोर येत नसल्याचे पाहून विक्रेत्यांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला. 
सुमारे अर्धा तास घोषणाबाजी केल्यानंतर विक्रेत्यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारात भाजीपाला टाकून घोषणाबाजी केली. दरम्यान मुख्याधिकार्‍यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर आंदोलक परत गेले. 
भाजीपाला विक्रेते परत गेल्यानंतर उपनगराध्यक्ष  विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पालिकेचे पक्षनेते अनिल अभंगराव, माजी नगरसेवक सचिन डांगे, नगरसेवक विक्रम शिरसट, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन याविषयार चर्चा केली. मात्र यासंदर्भात कोणताही  निर्णय झाला नाही असे सांगितले जाते.