Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Solapur › सेनेला धक्‍का; भाजपची टळली नामुष्की

सेनेला धक्‍का; भाजपची टळली नामुष्की

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 10:56PMसोलापूर : प्रतिनिधी 

उमेदवारी अर्ज भरताना गुरुवारी वादग्रस्त ठरलेली महापालिका सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया शनिवारी रद्द करण्यात येऊन नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामुळे  सत्ताधार्‍यांमधील दुहीचा फायदा उठवू इच्छिणार्‍या शिवसेनेला जोरदार हादरा बसला. तर सत्ताधार्‍यांना मोठा दिलासा मिळाला. नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी उमेदवार अर्ज स्वीकारण्यात येतील व बुधवारी निवडणूक होणार आहे. 

भाजपची मनपात सत्ता आल्यापासून महापालिका खूप चर्चेत आहे. सत्ताधारी भाजपमधील ना. विजयकुमार देशमुख व ना. सुभाष देशमुख या दोन गटांतील गटबाजी 
नेहमीच चर्चेत असते. एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशह, परस्परविरोधी भूमिका, असे प्रसंग वेळोवेळी दिसून आले आहेत. मनपा सर्वसाधारण सभांचा अक्षरश: भातुकलीचा खेळ झाला असतानाच गुरुवारी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन प्रचंड गोंधळ झाला. 

निवडणूक अर्ज भरण्यावरुन नगरसचिव कार्यालयात भाजपच्या दोन गटांत हमरीतुमरी झाली. शिवाय अर्ज पळविण्याचा नाट्यमय प्रकारही घडला. सत्ताधार्‍यांमधील या दुहीचा फायदा घेण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या क्षणी गोंधळ घालत भाजपला अर्ज भरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या दोन अर्जांपैकी एक अर्ज पळविल्यानंतर दुसर्‍या पण अनुमोदकाची सही नसलेला अर्ज सादर करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. यावरुन झालेल्या वादामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरली. दरम्यान, याच गोंधळात शिवसेनेने ही निवडणूक अविरोध जिंकल्याचा दावा केल्याने गोंधळात आणखी भर पडली. 

अर्ज भरताना झालेल्या गोंधळाबाबतची पुराव्यानिशी माहिती नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांना गुरूवारी सादर केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करीत नवीन कार्यक्रम घेण्याचा आदेश काढला. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी शनिवारी मनपात स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याचे सांगून नवीन कार्यक्रम जाहीर केला. विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांनी भारुड यांच्यावर विविध प्रश्‍नांची सरबत्ती करीत या निर्णयाला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला; मात्र भारुड हे ठाम होते. भारुड यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेल्याचे तसेच सत्ताधार्‍यांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भारुड यांनी गुरुवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया खुल्या, भयमुक्‍त वातावरणात न होता प्रचंड गोंधळात झाल्याने विभागीय आयुक्‍तांच्या मार्गदर्शनानुसार नवीन निवडणूक कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले. मंगळवार, 6 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, तर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित महापौर शोभा बनशेट्टी, नूतन सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक नागेश वल्याळ आदींनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाचे स्वागत केले.  दिलेल्या मुदतीच्या वेळेत अर्ज भरण्यापासून रोखल्याने भाजप उमेदवारावर अन्याय झाला होता. मात्र याची दखल घेऊन प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे महापौरांनी सांगितले. 

दरम्यान, गुरूवारी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी शनिवारी मनपात व बाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. स्थायी समिती सदस्यांनाच कौन्सिल हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.