Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Solapur › महापालिका सभेचे पावित्र्यच धोक्यात

महापालिका सभेचे पावित्र्यच धोक्यात

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 8:09PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिका सभेत वादावादी, गदारोळाचा अनिष्ट पायंडा पडला आहे. यामुळे महापालिका बदनाम झाली आहे. आता तर अधिकार्‍यांना धक्‍काबुक्‍कीबरोबरच समांतर सभा घेण्याचा घाट सदस्यांनी घातल्याने मनपा सभेचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.

एखादा विषय, मुद्यावरून महापलिका सभेत वाद, गदारोळ होणे ही काही नवीन  बाब नाही. अनेकदा असे प्रकार घडल्याचा इतिहास आहे. पण मनपात भाजपची सत्ता आल्यापासून वादावादी, गदारोळ हे नेहमीचेच झाले असून या गोष्टींचा अनिष्ट पायंडा पडला आहे. लोकशाही मूल्यांवर आधारित महापालिका सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. नागरी सुविधा, शहरहिताचे निर्णय या सभेत होत असल्याने ही सभा सर्वोच्च समजली जाते; मात्र या सभेचे पावित्र्यच जणू नष्ट होऊ पाहात आहे. याला सत्ताधारी-विरोधक ही दोन्ही मंडळी जबाबदार आहेत. सभेचे पावित्र्य जपण्यासाठी सभाशास्त्रानुसार सभा घेणे आवश्यक आहे. पण सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार मनपा सभेत दिसून येत आहेत. 

सत्ताधारी मंडळी स्वैर झाल्याचे गत वर्षभरापासून दिसून येत आहे. अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचे पडसाद चक्‍क सभेत उमटत आहेत. परस्परविरोधी भूमिका, शह-काटशह, कुरघोेडीचे प्रकार सत्ताधार्‍यांकडून होत असल्याने मनपात सत्ताधारी कोण व विरोधक कोण, असा प्रश्‍न पडला आहे. महापौरांना अवमानकारक भाषा वापरणे, एकाचवेळी दोन सभागृहनेते आदी प्रकार गेल्या काही महिन्यांत सभेत पाहावयास मिळाले. नुकत्याच झालेल्या सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून चक्‍क अधिकार्‍यांना धक्‍काबुक्‍की करून ढकलत नेण्याचा गंभीर प्रकारही घडला. याशिवाय अजेंडा फाडून सत्ताधार्‍यांविरोधात रोष व्यक्‍त झाला. तर महापौर या सभेचे अध्यक्ष असतात. सभाशास्त्राचे पालन त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

मात्र सदस्यांचा अधिकार हिसकावून घेतल्यामुळे तसेच सभा रेटून नेण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक सभांमध्ये महापौरांविरोधात सदस्यांनी घोषणाबाजी केली. यातूनच लोकशाहीचा गळा घोटला, लोकशाहीचा खून झाला हे आरोपही झाले. सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधकांनादेखील सभेचे पावित्र्य ठेवण्याचे भान राहिले नाही. नुकत्याच झालेल्या सभेत महापौरांनी सभा तहकूब केल्यावर समांतर सभा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधकांकडून झाला. एकंदर मनपा सभेचे वारंवार होणार्‍या वादावादी, गदारोळामुळे सोलापूर महापालिका चांगलीच बदनाम झाली आहे. 

Tags : Solapur, danger, sanctity, municipal, council