Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Solapur › अधिक मासाची गर्दी अन् मंदिर व्यवस्थापन बेवारस!

अधिक मासाची गर्दी अन् मंदिर व्यवस्थापन बेवारस!

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:14PMपंढरपूर : प्रतिनिधी

तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल दर्शनाकरिता पंढरीत गर्दी वाढू लागली असताना विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापन मात्र बेवारस अवस्थेत सापडले आहे. कार्यकारी अधिकार्‍यांकडे महसूलचा अन्य कारभार आहे, तर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यावरही आटपाडी (जि. सांगली) येथील महसूलचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या व्यवस्थापनाची ऐन गर्दीच्या भरात वार्‍यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अधिक मास हा हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात हिंदूधर्मीय लोक तीर्थक्षेत्र आणि देवदर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात जात असतात. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे या महिन्यात येणार्‍या भाविकांच्या संख्येत दुपटीहून अधिक भर पडत असते. संपूर्ण महिनाभर पंढरीत दररोज किमान 1 लाख लोक देवदर्शन, चंद्रभागा स्नानाकरिता येत असतात तसेच विठ्ठल दर्शनाकरिता दररोज 15 ते 20 हजार भाविक रांगेत उभे असतात. या भाविकांसाठी मंदिर समितीने केवळ पिण्याचे पाणी एवढीच सुविधा उपलब्ध करून दिली असून दर्शन रांगेत पत्राशेडपर्यंत सावली केली असून दर्शन मंडपाच्या पाचही मजल्यांतून भाविकांची गर्दी दर्शनाकरिता होऊ लागली आहे. मंदिर परिसरातही भाविकांची गर्दी वाढू लागली असून अशा गर्दीच्या काळात मंदिर समितीचे व्यवस्थापन मात्र बेवारस असल्याच्या अवस्थेत सापडले आहे. 

मंदिर समितीचे  कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे पंढरपूर आणि मोहोळ तालुक्याचा महसुली कारभार आहे. त्याचबरोबर त्यांना सातत्याने सोलापूर, पुणे येथे विविध बैठकांसाठी जावे लागते. त्यामुळे मंदिरासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. तर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आटपाडी (जि. सांगली) येथील नायब तहसीलदारपदाचा भार असल्यामुळे त्यांना आटपाडीलाही जावे लागते. त्यामुळे मंदिरात कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक हे दोन्ही महत्त्वाचे  अधिकारी आठवड्यातील बहुतांश दिवस उपस्थित राहू शकत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर मंदिराचा सगळा कारभार कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या जीवावर चालू असतो. सक्षम अधिकारी गैरहजर असल्यामुळे या कर्मचार्‍यांची दमछाक होत असून मंदिर समितीच्या कारभारात ढिसाळपणा येऊन भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. जबाबदार अधिकार्‍यांच्या गैरहजेरीत गर्दीच्या काळात गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे.