Tue, Jul 23, 2019 16:40होमपेज › Solapur › तुकोबांची मेघडंबरी, माऊलींच्या चौथर्‍याची दुरवस्था

तुकोबांची मेघडंबरी, माऊलींच्या चौथर्‍याची दुरवस्था

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:37PMपंढरपूर : प्रतिनिधी 

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर असलेल्या संत तुकाराम महाराज यांची मेघडंबरी आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच्या चौथर्‍याची सध्या दुरवस्था झालेली असून दुरूस्तीची गरज निर्माण झालेली आहे. पालखी सोहळा 10 दिवसांवर आलेला असतानाही चौथर्‍याची ही अवस्था पाहिल्यानंतर दुरूस्तीचे काम कधी हाती घेतले जाणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आषाढीच्या पार्श्‍वभूमीवरील या प्रकारामुळे वारकर्‍यांमध्ये संतापाची भावना आहे. 
संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासह आषाढी  यात्रेसाठी पंढरीच्या  दिशेने शेकडो संतांच्या पालखी  निघाल्या आहेत. वाखरी येथे या सर्व पालखी सोहळ्याचा अखेरचा मुक्काम असतो. 21 जुलै रोजी वाखरी येथील पालखी तळावर सर्व संतांच्या  पालख्या येणार आहेत. या तळावर 21 जुलै रोजी शेकडो पालख्यांसह लाखो भाविकांची मांदियाळी जमत असते. त्याअनुषंगाने संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामासाठी 2004 साली केंद्र सरकारच्या निधीतून मेघडंबरी उभी केली आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीसाठी परंपरेनुसार चौथरा निर्माण केला असून या दोन्ही ठिकाणी चौथर्‍यास  ग्रेनाईट फरशी बसवलेली आहे.

 मात्र गेल्या काही वर्षांपासून या फरशा निखळून पडू  लागल्या आहेत आणि मेघडंबरीसह चौथर्‍यालाही अवकळा आली आहे. यात्रेच्या तोंडावर निखळलेल्या फरशा यापूर्वी बसवण्यात आलेल्या आहेत. मात्र एक बसवल्यानंतर दुसरी फरशी निखळून पडत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत निखळलेल्या फरशाही बसवलेल्या नाहीत किंवा  मेघडंबरी  आणि चौथर्‍याची दुरुस्ती केलेली नाही. 

यंदा पालखी सोहळा 21 जुलै रोजी वाखरी पालखी तळावर विसाव्यासाठी येत असला तरी अद्यापही चौथरा आणि मेघडंबरीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे ज्या भागातील फरशा निघून पडलेल्या आहेत तो भाग विद्रुप दिसतो आहे. दोन्ही प्रमुख संतांच्या पालखी विसाव्याची ही दुरवस्था पाहून भाविकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.  यंदाच्या आषाढीतील पालख्या येथे मुक्कामी येण्यापूर्वी ही दुरूस्ती होणार का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.