Tue, Jul 23, 2019 07:08होमपेज › Solapur › पंढरपुरात राज्य धनगर आरक्षण कृती समितीचा इशारा

मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:28PMपंढरपूर : प्रतिनिधी

बारामती येथील आंदोलनावेळी येऊन कॅबीनेटच्या पहिल्या मिटींगमध्ये धनगर आरक्षणाचा विषय सोडवतो असे आश्‍वासन दिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात मात्र आरक्षणाच्या विरोधात म्हणने सादर केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला असून आषाढी यात्रेच्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांनी येऊ नये. त्यांना महापुजा करू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने पंढरीत पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी  प्रा. जयंत बगाडे, परमेश्‍वर कोळेकर, प्रा. शिवाजा बंडगर, पांडूरंग मेरगळ, माउली हळणवर, डॉ. मारूती पाटील, शालिवाहन कोळेकर, विठ्ठल आबा पाटील, रायाप्पा हळणवर, आदित्य फत्तेपूरकर, यशवंत नरूटे, धनाजी गडदे, बंटी लवटे सोमनाथ ढोणे, अतूल गावडे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना प्रा. शिवाजी बंडगर म्हणाले की, धनगर समाजाच्या मतांवरच हे राज्य सरकार सत्तेत आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे जाहीरपणे कबूल केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून भाजपला सत्तेत बसवले. मात्र आता भाजपनेही धनगर समाजविरोधी भुमिका न्यायालयात घेऊन समाजाची फसवणूक केली आहे. फडणवीस यांना सत्तेत राहण्याचा अधिकारी नाही त्यांनी राजीनामा देऊन पायउतार व्हावे.

प्रा. जयंत बगाडे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस केवळ सरकार सकारात्मक असल्याचे सांगते. त्यामुळे आरक्षणासाठी आणकी किती वाट पहायची. भाजपविरोधात आता निकराची लढाई लढावी लागणार असून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला जाणार आहे. त्यांच्याविरोधात निदर्शने केली जातील. चंद्रभागा नदीला एकादशीच्या दिवशी धनगर समाजातील युवक मुंडण करून सरकारचे श्राद्ध घालतील. मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता असेल तर त्यांनी पंढरपूरला शासकीय महापुजेसाठी येऊ नये. त्यांना महापूजा करू दिली जाणार नाही असाही इशारा दिला. 

यावेळी परमेश्‍वर कोळेकर म्हणाले की, यापूढे राज्यभर धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असून यापुढे भाजपच्या कोणत्याही मंत्र्यास पंढरपुरात शासकीय महापुजेस येऊ दिले जाणार नाही. या सरकारने सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवींचे नाव देण्याच विलंब लावला आणि तो विषय न्यायालयात लटकून राहिला. आरक्षणाविरोधी भुमिका घेतली असून  पंढरपूर हे धनगर आरक्षणाचे केंद्र बनवले जाईल असेही कोळेकर यावेळी म्हणाले.