Wed, Apr 24, 2019 16:15होमपेज › Solapur › बदललेल्या जलवाहिनीने 7 एमएलडी पाणी वाढले

बदललेल्या जलवाहिनीने 7 एमएलडी पाणी वाढले

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:05PMसोलापूर : दीपक होमकर

सोलापूरला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी ते सोलापूरपर्यंतच्या जलवाहिनीमधील केवळ दीड किलोमीटरची जलवाहिनी 24 जुलै ते 29 जुलै दरम्यान अमृत योजनेंतर्गत बदलण्यात आली होती. शिवाय उजनीपासून ते सोलापूरपर्यंतचे 17 व्हॉल्व बदलण्यात आले. त्यामुळे सुमारे सात एमएलडी (दशलक्ष लिटर्स) पाणी वाढले असल्याची माहिती आज मुख्य आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिली. सोलापूरवासीयांची रोजची तहान ही साधारण 190 दशलक्ष लिटर्स इतकी आहे. मात्र सध्याची उपलब्धता केवळ 100 दशलक्ष लिटर्स आहे. नुकत्याच बदललेल्या दीड किमी जलवाहिनीमुळे सुमारे 7 दशलक्ष लिटर्स पाणी वाढले आहे. उजनी धरण, टाकळी जलशुध्दीकरण आणि सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र येथील  पाणी उपसा करणार्‍या पाण्याच्या मोटर्स बदलल्या, तर आणखी दहा एमएलडी पाणी वाढेल. त्यामुळे सोलापूरच्या पाण्याची उपलब्धता 120 एमएलडी वाढेल व त्यामुळे दोन दिवसाआड पाणी देणे शक्य होणार आहे. 

सध्या उजनी व टाकळी येथे प्रत्येकी सहा, तर सोरेगाव येथे चार पाणी उपसा करणार्‍या 450  अश्‍वशक्तीच्या मोटारपंप आहेत. या सर्व पंपाचे आयुष्य 20 वर्ष होते. पाकणी येथील पंपाला 22, तर टाकळीच्या पंपाला तब्बल 48 वर्षे झाली आहेत. त्यामुळे या पंपांची पाणी उपशाची क्षमता कमी झाली आहे. त्याचा मोठा फटका पाणीपुरवठ्यावर होतो. हे सर्व पंप बदलण्यासाठी सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो निधी  राज्य सरकारच्या अमृत योजनेमार्फत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पंप बदलाची प्रक्रिया सुरु झाली असून डिसेंबरपर्यंत पंप बदलण्याचे टार्गेट आयुक्त डॉ. ढाकणे यांनी ठेवले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच 17 एमएलडी पाणी वाढेल व त्याचे व्यवस्थित वितरण केले, तर सोलापूरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे.

सध्या उजनी ते सोलापूर या  समांतर पाईपलाईनची चर्चाही जोरात सुरु आहे. ही नवी पाईपलाईन झालीच तर त्याद्वारेही सोलापूरला दररोज 110 एमएलडी पाणी येणार आहे. त्यामुळे उजनीतून तब्बल 260 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यात हिप्परग्याचे 4 ते 5 एमएलडी पाणी कायमस्वरुपी आहेच. त्यामुळे 190 एमएलडी पाण्याची तहान असलेल्या सोलापूरकरांना 265 एमएलडी पाणी उपलब्ध होऊन रोज पाणीपुरवठा होणे शक्य होणार आहे.

वितरण व्यवस्था सुधारणे गरजेचे
सोलापुरातील विशेषतः जुळे सोलापुरातील जलवितरणाची व्यवस्था प्रचंड अपुरी आहे. साधू वासवानी उद्यानातील एक सहा इंची पाईपलाईन, तर तब्बल दहा किमीपेक्षा लांबपर्यंत पाणीपुरवठा करते. त्यामुळे टेलएण्डला पाणी जाण्यास प्रचंड उशीर होतो आणि रात्री-बेरात्री पाणी येण्याचा प्रकार घडतो. आदर्श जलवितरण व्यवस्थेत सहा इंची जलवाहिनीवर केवळ 200 लोकांचा पाणीपुरवठा व्हावा. मात्र आपल्याकडे हजारांवर लोकांचा पाणीपुरवठा केला जातो. त्यात पुन्हा 4 इंची उपवाहिनी जोडली जाते. अमृत योजनेतून ही जलवितरण व्यवस्था अधिक व्यापक  करण्याचे नियोजन सुरु आहे.