होमपेज › Solapur › बजेट लाल फितीत अडकले!

बजेट लाल फितीत अडकले!

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 10:11PMसोलापूर : दीपक होमकर

सत्ताधार्‍यांच्या ‘तू तू मै मै’मुळे गेल्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक तब्बल आठ-दहा महिन्यांच्या विलंबाने सभागृहात सादर झाले होते. त्यात थोडीशी सुधारणा करून पदाधिकार्‍यांनी यंदा अडीच महिने विलंबाने अर्थसंकल्प सादर केला खरा; मात्र अर्थसंकल्पाच्या सभेला पंधरा दिवस झाले, तरी अद्याप त्याच्यातील दुरुस्तीसाठी ते नगरसचिव कार्यालयातच पडून आहे. त्यामुळे यंदाचे आर्थिक अंदाजपत्रक लाल फितीत अडकल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत सर्व विभागांना त्यांंच्यासाठी नेमके किती बजेट दिले आहे, ते कळाल्याशिवाय वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन करता येत नाही. गेल्या वर्षी सत्ताधार्‍यांमधील गटबाजीमध्ये तब्बल आठ-दहा महिने बजेट उशिरा सादर झाल्याने अनेक विभागांचे वर्ष नियोजनाअभावी आणि कार्यक्रमाअभावी गेले.  आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, अर्थात 

31 मार्चपर्यंत अर्थसंकल्प सादर होणे अपेक्षित असते. मात्र यंदाही 12 जून रोजी अर्थात अडीच महिने उशिराने बजेट सभागृहात सादर झाले. त्यावेळी सत्ताधार्‍यांच्या सूचना, विरोधी पक्षांची व इतर गटांच्या उपसूचना घेऊन अर्थसंकल्पात दुरुस्त्या करण्याचे काम हे नगरसचिव विभागाचे आहे. त्या दुरुस्त्या तातडीने करून आयुक्त कार्यालयाकडे आठ दिवसांत पाठविण्याचे संकेत आहेत. त्यानंतर आयुक्तांच्या सहीनंतर संबंधित अंतिम अर्थसंकल्प वित्त व लेखाधिकारी विभागाकडे जाते. तेथून प्रत्येक विभागाला (शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण) वर्षभरातील किती निधी  देण्यात येणार याची माहिती दिली जाते. त्यानुसार सर्व विभाग त्यांच्या वर्षभरातील कार्यक्रम योजनांचे नियोजन करते. बजेटनंतरच नगरसेवकांनाही वॉर्ड विकास निधी किती दिला याची माहिती मिळते व ते त्यातून विकासकामे सुचवितात. मात्र यंदा पदाधिकार्‍यांनी अडीच महिने उशीर केला असून आता प्रशासनाकडून दुरुस्तीच्या कामातच पंधरा दिवस उशीर होत असल्याने यंदाच्या वर्षी तर विविध विभागांचे कार्यक्रम आणि नगरसेवकांच्या वॉर्ड विकासकामे होणार आहे की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

आणखी दोन-तीन दिवस लागणार : दंतकाळे

बजेट सादर झाल्यावर आलेल्या  सूचना व उपसूचना मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दुरुस्त केलेला अर्थसंकल्प आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसचिव  प्रवीण दंतकाळे यांनी दिली.