Sat, Aug 24, 2019 00:37होमपेज › Solapur › आंदोलनाचा भडका; रस्त्यावर दुधाचा पाट!

आंदोलनाचा भडका; रस्त्यावर दुधाचा पाट!

Published On: Jul 17 2018 1:47AM | Last Updated: Jul 17 2018 1:42AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरसह राज्यात दूध आंदोलनाचा भडका उडाला असून ग्रामीण भागात रस्त्यावर दूध फेकून ठिकठिकाणी दुधाचा चिखल झाला होता. दूध आंदोलनावर तोडगा न निघाल्यास दुधाचे दर गगनाला भिडतील, अशी भीती शहरवासीय करत आहेत. दुधाला योग्य भाव मिळेपर्यंत जिल्हाभरातील शेतकरी दूध विक्री करणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून रस्त्यावर दूध ओतले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाची सुरुवात केली आहे. 

सोलापुरातदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 4 जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात शेतकर्‍यांची बैठक घेत आंदोलनाचा आराखडा तयार केला होता. दुधाला प्रति लिटर 5 रु. अनुदान द्यावे आणि 35 रु. प्रति लिटर भाव देण्यात यावा, ही प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी केली आहे.राज्यात गायीच्या दुधाचे एक कोटी पाच लाख लिटरच्या आसपास संकलन होते. दूध संघाला प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्यात आले आहे. मात्र दूध संघाने ते अन्यत्र वळवले आहे. याप्रकरणी प्रत्यक्ष दूध उत्पादक किंवा राज्य सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा करावे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. यापूर्वी पुणे शहरात दूध आंदोलन केले होते, परंतु सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे 16 जुलैपासून कोणताही शेतकरी दूध विकणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकर्‍यांनी दुधाचा चिखल केलादक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व शेतकर्‍यांनी रविवारी रात्री दूध विक्री  न करण्याचा निर्णय घेतला आहे.गावातील दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळत नाही तोपर्यंत एकही शेतकरी दूध विक्री करणार नाही, असे संघटनेचे महामूद पटेल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी महामूद पटेल, विजय रणदिवे, भीमाशंकर व्हनमाने, सुरेश बने, राजू घोडके, आटकर, हमीद पटेल आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयामोर मोफत दूध वाटप करून आंदोलन केले. जिल्हा दूध संघ शेतकर्‍यांकडून फक्त  16 किंवा 17 रुपये दराने प्रति लिटर दूध विकत घेते व दूध पाकिटांमधून 44 ते 46 रुपयांपर्यंत विक्री करते, तर शेतकर्‍यांकडून कमीत कमी 25 ते 27 रुपये प्रति लिटर दराने विकत घ्यावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.