Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Solapur › ‘सिव्हिल’मध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

‘सिव्हिल’मध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर सबजेलमध्ये गुप्तांगावर ब्लेडने वार करुन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीनेच पुन्हा एकदा सिव्हिल हॉस्पिटलमधील कैद्याच्या वॉर्डमध्ये लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब उत्तम आवारे (वय 48, रा. सबजेल, सोलापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहायक फौजदार लक्ष्मण धोत्रे यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या रावसाहेब आवारे याने वॉर्डमधील खिडकीच्या लोखंडी गजास स्वतः वापरत असलेली लुंगी एका टोकाने खिडकीच्या गजास बांधून दुसर्‍या टोकाने फास बनवून गळ्यात घालून वॉर्डमधील कॉटवर चढून उभा राहून गळ्यात घालून कॉटवरून उडी मारली. 

ही बाब कैदी वॉर्डच्या बंदोबस्तासाठी असलेले सहायक फौजदार  लक्ष्मण   धोत्रे  यांच्या निदर्शनास आल्याने लागलीच त्यांनी वार्डात जाऊन गळफास घेतलेल्या आवारे यास  खाली उतरवून उपचारासाठी ओपीडीमध्ये दाखल केले. आवारे यांच्यावर उपचार सुरूआहेत. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

रावसाहेब आवारे याने  5 मार्च रोजी  दुपारी  पावणेदोन  वाजण्याच्या  सुमारास सोलापूर येथील जिल्हा कारागृहात माझ्यावर  खोटा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे, एक महिना झाला तरी मला कोणीही भेटायला आले नाही, मी मेलो तरच माझ्या जागेवर माझ्या मुलीला नोकरी लागेल या कारणास्तव स्वतःच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. 

सबजेलमध्ये न्हावी काम करणार्‍यांची नजर  चुकवून आवारे याने  दाढी करण्याचे ब्लेड घेऊन  शौचास जाण्याचा बहाणा करुन बॅरेक क्रमांक 5 च्या  मागे जाऊन स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला  होता. त्यामध्ये आवारे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आवारेला सिव्हिल  हॉस्पिटलमधील  कैदी वॉर्डात ठेवण्यात आले होते. 

आता पुन्हा एकदा आवारे याने सिव्हिल हॉस्पिटलमधील कैदी वॉर्डात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खरोखरच आवारे याच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे या प्रकरणाची आता वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

कैदी वॉर्डच्या बंदोबस्ताबाबत साशंकता?
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणारे आरोपी हे कैदी वॉर्डात ठेवण्यात येतात, तर या कैदी वॉर्डला 1 अधिकारी व 3 कर्मचारी असे गार्ड  बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. बुधवारी रावसाहेब आवारे या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या घटनेवेळी कैदी वॉर्डात बंदोबस्तासाठी केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता, अशी चर्चा हॉस्पिटलमधून होत आहे. त्यामुळे कैदी वॉर्डच्या बंदोबस्ताबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.