Fri, Sep 21, 2018 22:05होमपेज › Solapur › संत तुकाराम अभिमत विद्यापीठास मुख्यमंत्र्यांची मान्यता

संत तुकाराम अभिमत विद्यापीठास मान्यता

Published On: May 20 2018 12:37PM | Last Updated: May 20 2018 12:37PMपंढरपूर :  प्रतिनिधी

गेल्या सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत तुकाराम संत विद्यापीठास मुख्यमंत्र्यांनी शनिवारी तत्वतः मान्यता दिली असून अभिमत विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची आषाढी यात्रेच्या वेळी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या विद्यापीठामुळे  गेल्या ३० वर्षांची वारकऱ्यांची एक मागणी पूर्णत्वास जात आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की , महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय याचा अभ्यास केला जावा, याचा प्रसार व्हावा. यासाठी संत तुकाराम विद्यापीठ सुरू करावे अशी शिफारस नाडकर्णी आयोगाने केली होती. त्यानंतर पंढरपूर मंदिरे कायदा अस्तित्वात आला आणि त्याची अंमलबजावणी ही गेल्या ३ दशकापासून केली जात आहे. मात्र संत विद्यापीठ स्थापनेचा विषय प्रलंबित होता. याबाबत सर्वच स्तरातून मागणी होत होती.

दरम्यान मागील महिन्यात मुंबईत याविषयी झालेल्या बैठकीत विद्यापीठाचे स्वरूप आणि अभ्यासक्रम याविषयी चर्चा झाली होती. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभिमत विद्यापीठास तत्त्वतः मान्यता दिली आहे. सद्य स्थितीत पर्यटन महामंडळाच्या जागेत पर्यटक निवास येथे हे विद्यापीठ सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यापीठावर १८ तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून संतांच्या अभ्यासक्रमावर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.  येत्या आषाढी यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः या विद्यापीठाची अधिकृत घोषणा करतील असे अधिकृत सूत्रांकडून समजते.