Mon, Apr 22, 2019 16:09होमपेज › Solapur › नगरपंचायतीचा कारभार ‘असून अडचण नसून खोळंबा’

नगरपंचायतीचा कारभार ‘असून अडचण नसून खोळंबा’

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 8:28PM सोलापूर : महेश पांढरे

नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींमध्ये पूर्वीचे ग्रामपंचायत सदस्य आता नगरसेवक झाले असले तरी जनतेची सेवा करण्यासाठी नगरपालिकांकडे सेवेकर्‍यांची कमतरता असल्याने नगरसेवक नावालाच नगरसेवक झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या कर्मचारी आकृतीबंदाप्रमाणे विविध पदांची तात्काळ भरती करावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, माढा आणि माळशिस या तीन नगरपंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. याठिकाणी पूर्वी ग्रामपंचायती होत्या. त्याठिकाणी आता नगरपंचायत आल्याने पूर्वीचे ग्रामपंचायत सदस्य आता नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून विकासकामांचा व इतर मूलभूत सेवासुविधा पुरविण्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र या नगरपंचायतींमध्ये अनेक पदे रिक्‍त असल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नगरसेवकांना अपयश येत आहे. दुसरीकडे प्रमुख अधिकार्‍यांची पदे ही प्रभारी आहेत. त्यामुळे नगरपंचायतींचा कारभार ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी झाली आहे. मोहोळ, माढा आणि माळशिरस या शहरांना आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. 

त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या आकृतीबंदाप्रमाणे याठिकाणी मुख्याधिकारी, स्थापत्य अभियंता, मलनिस्सारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी, लेखापाल व लेखापरीक्षक, कर निर्धारक व कर वसुली अधिकारी तसेच नगररचनाकार या प्रमुख पदांसह वाहनचालक, अग्निशमन यंत्रणा आणि इतर शिपायांची पदे मंजूर आहेत. मोहोळसाठी 15, तर माढा आणि माळशिरससाठी प्रत्येक आठ पदे मंजूर आहेत. नगरपंचायतींना आता दोन वर्षे पूर्ण झाली तरी ही पदे अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नगरपंचायतीच्या विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही रिक्‍त पदे भरण्याची मागणी होत आहे.