Wed, Apr 24, 2019 11:28होमपेज › Solapur › मंद्रुप येथे उपबाजार समितीचा ठराव

मंद्रुप येथे उपबाजार समितीचा ठराव

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:19PMसोलापूर : प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती स्थापन करणे व बाजार समितीमधील ठेवी ज्या बँकेकडून जास्त व्याजदर देण्यात येईल, त्या बँकेत ठेवण्याचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत  घेण्यात आल्याची माहिती सभापती दिलीपराव माने यांनी दिली. 

सभापती माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक इंदुमती अलगोंडा-पाटील, जितेंद्र साठे, बाळासाहेब शेळके, प्रकाश चौरेकर, प्रकाश वानकर, राजू वाघमारे, केदार उंबरजे, वसंत पाटील, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, आप्पासाहेब पाटील, नामदेव गवळी, रामप्पा चिवडशेट्टी आदी उपस्थित होते. पालकमंत्री तथा संचालक विजयकुमार देशमुख व विजया भोसले यांनी सभेसाठी रजेचा अर्ज दिला होता. 

मंद्रुप येथील उपबाजार समितीसाठी जागा संपादन करणे व अपेक्षित बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी सुमारे 50 एकर जागा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या महिन्याअखेरपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. 

बाजार समितीच्या सध्या सुमारे 55 कोटींच्या मुदतठेवी कॅनरा बँकेत आहेत. या ठेवीसह अन्य मुदत संपणार्‍या ठेवी सर्वात व्याजदर जास्त देणार्‍या बँकेत ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी सर्व बँकांना दर देण्यासाठी आमंत्रित करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बाजार समितीत रात्री शेतमाल घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना रात्री मुक्कामासाठी निवास व भोजनाची सोय बाजार समितीच्यावतीने करण्यात यावी, अशी मागणी यावेळी संचालक जितेंद्र साठे यांनी केली. यावर योग्य निर्णय घेण्याचे ठरले. बीओटी तत्वावर अशा प्रकारच्या सुविधा शेतकर्‍यांना देण्याची भूमिका यावेळी सभापती माने यांनी व्यक्त केली. 

बाजार समितीच्या आवारात सोलर प्रकल्प उभारून पणन खात्याच्या माध्यमातून वीजबिल बचत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बाजार समितीमधील सीसी कॅमेरे सुरु करण्यासाठी व सुरक्षा व्यवस्था वाढीव 50 सुरक्षारक्षकांसह पुरविण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

बाजार समिती संचालकांना देय असणारा प्रवास व उपस्थिती भत्ता न घेण्याचा निर्णय सभापती दिलीपराव माने, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संचालक राजकुमार वाघमारे, केदारनाथ उंबरजे यांनी घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

बाजार समितीमधील ज्या आडतदारांकडून शेतकर्‍यांना पट्टी मिळणे बाकी आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना तातडीने संबंधित आडतदारांकडून पट्टी देण्यात यावी व अशा आडतदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी अनेक संचालकांनी सभेत केली.

126 कर्मचार्‍यांना अखेर दिलासा मिळाला
बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने 126 कर्मचार्‍यांची नियमबाह्य भरती करुन सुमारे 20 कोटी रुपयांचा गैरप्रकार वेतनावर खर्च केल्याचा ठपका लेखापरीक्षकाकडून ठेवण्यात आला होता. त्यामुळे यानुसार बाजार समितीकडून या कर्मचार्‍यांना विनावेतन करण्याबाबतची नोटीस देण्यात आली होती. सदर प्रकरणी कर्मचार्‍यांनी न्यायालयात धाव घेत, याप्रकरणी कारवाईस स्थगिती आदेश मिळविल्याने, त्यांना तूर्ततरी दिलासा मिळाला असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न मिटला आहे.