Sat, Feb 23, 2019 14:13होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात आज रौप्यमहोत्सवी पाणी संघर्ष परिषद

मंगळवेढ्यात आज रौप्यमहोत्सवी पाणी संघर्ष परिषद

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:11PMवाळवा : धन्वंतरी परदेशी

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोर्‍यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यांतील जनतेची रौप्यमहोत्सवी पाणी संघर्ष परिषद मंगळवारी (दि. 26) दुपारी 1 वाजता यशवंत मैदान, इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथे आयोजित केल्याची माहिती निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली. 

या परिषदेत आमदार गणपतराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. भारत भालके मार्गदर्शन करणार आहेत. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना कृष्णा खोर्‍यातील हक्काचे पाणी मिळावे म्हणून दि.11 जुलै 1993 रोजी पहिली पाणी परिषद घेतली. त्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. दीर्घकाळ दिलेल्या या  लढ्यामुळे दुष्काळी काही भागांतील जनतेला पाणी मिळाले. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील 13 दुष्काळी तालुक्यांतील जनतेची चळवळ उभा राहिली. त्यामुळे सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करणे भाग पडले. तीन वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धिहाळ तलावात पाणी आले. म्हणून गेल्या वर्षीची पाणी परिषद विजयी पाणी परिषद म्हणून साजरी केली. 

टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, नीरा, देवधर या योजनांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन विकास योजनेत समावेश करून निधी मिळावा. या योजनांचे पाणी समन्यायी वापराच्या तत्त्वावर आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत, कवठेमहंकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्व, पलूस, खटाव, खंडाळा, माण आदी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळावे आदी मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रा. आर. एस. चोपडे, डॉ. बाबुराव गुरव, शिवाजीराव काळुंगे, बाळासाहेब नायकवडी, माजी आ. शरद पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, महादेव देशमुख, भाई चंद्रकांत देशमुख, प्रा. दत्ताजीराव जाधव, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. विश्‍वंभर बाबर आदी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेने हक्काचे पाणी मिळावे म्हणून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.