Tue, Apr 23, 2019 23:39होमपेज › Solapur › शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी शासनाची समिती

शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी शासनाची समिती

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:04PMसोलापूर : रणजित वाघमारे

राज्यातील विद्यापीठेे आणि शैक्षणिक संस्थांच्या उणिवा दूर करून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आदींची बैठक झाली असून यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 

उच्च शिक्षणाचा व शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचे सद्यस्थितीचे मूल्यांकन करून त्यातील उणिवा दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामुळे शैक्षणिक संस्थांचे मानांकन आणि शैक्षणिक दर्जाही वाढेल. 

सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाचे  कुलगुरू समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत.  सदस्यपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, पुणे उच्चशिक्षण संचालक आणि रूसाचे सहसंचालक सदस्य सचिवपदी असणार आहेत. 

13 विद्यापीठे आणि 100 महाविद्यालयांचा समावेश
शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यातील 13 विद्यापीठे आणि 100 महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. उणिवा दूर करून दर्जा वाढवण्यासाठी समिती व्यावसायिक संस्थेची निवड 5 वर्षांकरिता करणार आहे. या समितीकडून सर्व विद्यापीठांसाठी एकसमान मसुदा तयार करून  पुढील कार्यवाही करेल आणि दर 3 महिन्यांनी शासनास याबाबतचा अहवाल सादर करेल.