Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Solapur › वृद्ध महिलेच्या गळ्यातील गंठण ‘धूम’ स्टाईलने लंपास

वृद्ध महिलेच्या गळ्यातील गंठण ‘धूम’ स्टाईलने लंपास

Published On: Apr 15 2018 1:26AM | Last Updated: Apr 15 2018 1:26AMसोलापूर : प्रतिनिधी

दुचाकीवर पाठीमागे बसून जाणार्‍या वृध्द महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ‘धूम’ स्टाईलने जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी मार्केट यार्ड चौक परिसरात घडली.याबाबत आशिष मनिष दंतकाळे (वय 18, रा. शुक्रवार पेठ, माणिक चौक, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष  दंतकाळे हा त्‍याची आजी कस्तुरीबाई बालकिसनराव महिंद्रकर यांना दुचाकीवर बसवून पुणे-हैदराबाद रोडवरील अ‍ॅग्रोमिल जवळील सर्व्हिस रोडवरुन शुक्रवारी सायंकाळी जात होते. त्यावेळी मार्केट यार्ड चौकाच्या अलीकडे दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या भामट्याने दंतकाळे याच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कस्तुरीबाई यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. याबाबत  जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

सराफ दुकानातून 8 हजारांची सोनसाखळी लंपास

सराफ दुकानातून 8 हजार रुपयांची सोनसाखळी   चोरुन   नेणार्‍या  दोघांविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुरेश वेर्णेकर (वय 23, रा. मुकुंदनगर, भवानी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन राजेंद्र हणमंतू गायकवाड आणि चंद्रकला राजेंद्र गायकवाड (रा. विजापूर नाका झोपडपट्टी नं. 2, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी यंकाळी नितीन वेर्णेकर यांच्या चौडेश्‍वर म्हाळसा ज्वेलर्स या दुकानात येऊन राजेंद्र व चंद्रकला गायकवाड या दोघांनी सोनसाखळी दाखविण्यासाठी सांगितली. त्यावेळी वेर्णेकर यांनी सोनसाखळी दाखविल्यानंतर ते आम्हास पसंत नाही असे म्हणून बाहेर गेले. त्यानंतर सोनसाखळीचे वजन केले असता त्याचे वजन कमी आढळून आले. त्यामुळे या दोघांनी सोनसाखळीपैकी 8 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी शर्टमध्ये लपवून चोरुन नेली म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक काळे तपास करीत आहेत.

तोतयागिरी करणार्‍या रिक्षाचालकाविरुध्द गुन्हा दाखल

खोटे नाव सांगून तोतयेगिरी करुन फसवणूक करणार्‍या रिक्षाचालकाविरुध्द  सदर बझार पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत चंद्रकांत घोडके (वय 37, रा. मंगळवेढेकर चाळ, प्रभात टॉकिजमागे, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय चवरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

27 मार्च रोजी पत्रकार भवन चौकात पोलिस  उपनिरीक्षक संजय चवरे  यांनी  रिक्षाचालक  श्रीकांत घोडके याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार खटला  दाखल केला. त्यावेळी श्रीकांत घोडके याने त्याचे नाव राहुल रामचंद्र जाधव (वय 30, रा. निराळे वस्ती, सोलापूर) असे सांगितले. खरे नाव सांगणे बंधनकारक असताना त्याने नाव व पत्त्याबाबत खोटी माहिती सांगून फसवणूक केली म्हणून सदर बझार पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हवालदार कांबळे तपास करीत आहेत.

बिअरची बाटली डोक्यात मारणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारणार्‍या दोघांविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव दीपक डोईजडे (वय 18, रा. उत्तर कसबा, चौपाड, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन अंबादास, पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री दहाच्यादरम्यान अजिंक्य हॉटेल व संकेत हॉटेलच्या मध्ये  असलेल्या बोळाशेजारी अंबादास व पवार नावाच्या व्यक्तींनी वैभव डोईजडे यांनी बोलावून घेऊन मारहाण केली तसेच रिकामी बिअरची बाटली वैभवच्या डोक्यात मारत असताना त्याने हाताने अडविल्याने त्या बाटलीचे काचेचे तुकडे मस्तकात व कानात लागून वैभव जखमी झाला म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार चौधरी तपास करीत आहेत.

Tags : Dhoom style,  old woman's neck , lipas solapur news