सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून अनियमितता आणि भ्रष्टाचार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. सहकारमंत्र्यांनी एकाच संस्थेचे पाचवेळा ऑडिट करून पोलिस व सहकार विभागाच्या अधिकार्यांवर प्रचंड दबाव आणून सुडापोटी फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी दिलीप माने यांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्यातील प्रत्येक मुद्दा खोडून काढला.
कामगारांबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पगार व सानुग्रह अनुदानाची दिलेल्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समितीने राबविलेल्या नवनवीन योजनांच्या जाहिराती करण्यात आल्या असून स्वतःची एकही जाहिरात करण्यात आलेली नाही. या जाहिरातीच्या पावत्या कार्यालयात जमा आहेत. राज्यात कुठेही बाजार फी दररोज वसूल केली जात नाही. बाजार समितीच्या कारभाराची वर्षानुवर्षाची जी पध्दत आहे त्याचप्रमाणे काम केले. व्यापार्यांकडील भाडे हे 2018 च्या रेडीरेकनरवरून दाखविले आहे. त्यामुळे भाडे हे कुठेही रेडीरेकनरनुसार घेण्यात येत नाही. 3 व्यापार्यांना वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांबाबत संचालक मंडळात मान्यता घेण्यात आलेली आहे. 100 गाळ्यांचे वाटप हे माजी सभापती बाबुराव चाकोते यांच्या काळात लिलाव पध्दतीने झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत 200 टाक्यांचे वाटप केलेले हे पणनमंत्र्यांना पत्र पाठवून करण्यात आले होते. व्यापार्यांच्या अतिक्रमणाचा विषय हा गुन्ह्याचा भाग होत नाही. कामगार भरती 2011 पूर्वीच झालेली आहे. ब्रम्हदेवदादा माने बँकेतील ठेवी मुदतीपूर्वीच काढल्याने बाजार समितीचे उलट 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे माने यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष लेखापरिक्षक डोके, सातपुते, लावंड, काकडे अशा पाच अधिकार्यांकडून सहकारमंत्र्यांनी ऑडिट करून घेतले. विशेष लेखापरिक्षक डोके यांनी त्यांच्या अहवालात फौजदारी दंडसंहिताखाली येणारे अपहार, अफरातफर व गैरव्यवहाराचे मुद्दे ऑडिटमध्ये नसल्याने या मुद्द्यांबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केलेले आहे. तरीही सहकारमंत्र्यांनी बाजार समितीचे पाचवेळा ऑडिट केले. फिर्याद दाखल केल्यानंतर विशेष लेखापरिक्षक काकडे हे रुग्णालयात अॅडमिट झाले होते. यावरुन सहकारमंत्र्यांचा सहकारमधील अधिकार्यांवर किती दबाव आहे हे स्पष्ट होते, असेही माने यांनी सांगितले. ऑडिट रिपोर्टवर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदविले आहे.
बाजार समितीच्या प्रचारात सहकारमंत्र्यांकडून ठेवणीतील शब्द काढून आरोप केले जात आहेत. या निवडणुकीत सिध्देश्वर शेतकरी विकास आघाडीने दिलेेले उमेदवार हे चांगले व अनुभवी आहेत. विरोधकांकडून होणार्या घाणेरड्या आरोपांमुळे मतदारांमध्ये चीड निर्माण झाली आहे. सहकारमंत्र्यांनी जनतेत गैरसमज निर्माण करुन मोठी धूर्त खेळी केली असल्याचेही माने यांनी सांगितले.आपल्या काळात बाजार समितीमध्ये बेदाणा मार्केट सुरु करण्यात आले, डाळिंब विक्री वजनावर केली, पाण्याच्या टाक्या दिल्या, अशी कामे करण्यात आली. यामुळे उलट बाजार समितीचा फायदाच झाला आहे. सोलापूर बाजार समिती ही ‘अ’ वर्गातील समिती असल्याचे सांगत सिध्देश्वर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व जागा निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.या पत्रकार परिषदेस बाळासाहेब शेळके, डॉ. किरण देशमुख, प्रकाश वानकर, जितेंद्र साठे, गणेश वानकर, बिज्जू प्रधाने आदी उपस्थित होते.