Thu, Apr 25, 2019 23:38होमपेज › Solapur › स्थायी समिती सभापतीप्रकरणी ‘तारीख पे तारीख’

स्थायी समिती सभापतीप्रकरणी ‘तारीख पे तारीख’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने पुन्हा तारीख दिल्याने ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम आहे. आता पुढील सुनावणी 3  एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे बजेट लांबू नये म्हणून मनपा पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना बजेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची मागणी केली आहे. 

स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. या पदासाठी अर्ज भरतेवेळी भाजपमध्ये बंडखोरीचे नाट्य घडले. यावेळी बंडखोराचा अर्ज पळविण्याचा प्रकार घडला. तदनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरतेवेळीदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली होती. शिवसेनेने अर्ज भरण्याची वेळ संपल्याचे सांगत भाजपला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले होते. या प्रकरणी विभागीय आयुक्तांना तक्रार गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पीठासीन अधिकार्‍यांना योग्य निर्णय द्या, असे आदेश दिले होते. तद्नंतर काही वेळेतच त्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द करुन फेरनिवडणूक घेण्याचा सुधारित आदेश काढला होता. या आदेशाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली.  याप्रकरणी न्यायालयाने सुरूवातीला 19 मार्च रोजी सुनावणी घेण्याची तारीख दिली होती. 19 मार्च रोजी विभागीय अधिकार्‍यांच्या वकिलांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केल्यावर ती मान्य करीत न्यायालयाने 26 मार्च रोजी पुढील सुनावणी जाहीर केली होती. सोमवारी याप्रकरणी मनपाच्या वकिलांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी  मान्य करीत 3 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.  वारंवार तारीख पडत असल्याने ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कायम असल्याचे दिसून येत आहे.

बजेट थेट सर्वसाधारण सभेत

सभापतीपदाच्या वादामुळे मनपाचे बजेट लांबत चालले आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील तारीख पडल्याने मनपाच्या पदाधिकार्‍यांनी बीपीएमसी अ‍ॅक्ट 35 अ नुसार मनपाचे बजेट प्रशासनाने थेट मनपा सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची विनंती आयुक्तांकडे केली आहे. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी आयुक्तांना भेटून ही मागणी केली. यावर आयुक्तांनी नगरसचिवांना सूचना देऊन प्रशासनाच्या बजेटचा प्रस्ताव  मनपा सभेकडे पाठविण्यास सांगितले. बजेटबाबत विरोधकांना विश्‍वासात घेण्याच्यादृष्टीने 28 मार्च रोजी  सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक महापौरांनी बोलाविली आहे.

Tags : Solapur, Solapur News, Commissioner, demanded, budget, general meeting


  •