होमपेज › Solapur › चैत्री यात्रा; 65 एकर परिसरात सामसूम

चैत्री यात्रा; 65 एकर परिसरात सामसूम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

चैत्री यात्रेनिमित्त येणार्‍या भाविकांची मुक्‍कामाची सोय 65 एकर या ठिकाणी करण्यात आली आहे. परंतु  भाविकांअभावी 65 एकर परिसरात सामसूम असल्याचे दिसून येत आहे. वर्षातील मोठी यात्रा असूनही 65 एकरात केवळ 55 प्लॉटचे वितरण झाले असून गर्दीअभावी सामसूम असल्याने आपत्कालीन विभाग देखील शांतपणे झोपलेला असल्याचे चित्र दिसून येते. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता चैत्री यात्रा सोहळ्यास तीन लाख भाविक उपस्थिती दर्शवतात. मात्र सध्या वाढत्या तापमानाचा फटका भाविकांना बसत असल्याने  या यात्रेकडे भाविकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येते. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग व स्टेशन रोड वगळता इतरत्र भाविक दिसून येत नाहीत.  65 एकर येथे भाविकांसाठी निवासाची सोय करण्यात आल्याने या ठिकाणी प्रत्येक यात्रेत भाविक तंबू व राहुट्या ठोकून वास्तव्य करतात. चैत्री यात्रेतही प्रशासनाच्यावतीने भाविकांना  पिण्याचे पाणी, वीज, प्रथमोपचार केंद्र, शौचालये आदींची चोख व्यवस्था केली आहे. मात्र या ठिकाणी भाविकांची म्हणावी तशी उपस्थिती दिसत नाही.

 एकूण 383 प्लॉट पैकी बुकिंग करण्यात आलेल्या 55 प्लॉटवर एकूण 25ते 30 हजार भाविकांची नोंदणी झाली आहे. या ठिकाणी दोन ते अडीच लाख भाविक वास्तव्य करू शकतील. अशी व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. 65 एकर प्रवेशव्दाराजवळ उभारण्यात आलेल्या आपतकालीन मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी भाविकांच्या समस्या सोडविण्याऐवजी शांतपणे झोपण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या भाविकांना उन्हामुळे उष्माघात, चक्‍कर येणे, डोके दुखी आदी प्रकार वाढत आहेत. अशा भाविकांना प्रथमोपचार  केंद्रात औषधोपचार करण्यात येतात. परंतु या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रावर बोर्ड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे प्रथमोपचार केंद्र असल्याचे भाविकांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे प्रथमोपचार केंद्र असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था भाविकांची झाली आहे.

Tags : Solapur, Solapur News, The 65 acres, samosoom, Chaitra Yatra, Pandharpur, devotees


  •