Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Solapur › स्मार्ट विद्यापीठासाठी मनपाचे सहकार्य राहील

स्मार्ट विद्यापीठासाठी मनपाचे सहकार्य राहील

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 02 2018 2:01AMसोलापूर : प्रतिनिधी

स्मार्ट विद्यापीठासाठी कुलगुरूंनी  विविध अभ्यासक्रम, भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी मनपाचे विद्यापीठास सहकार्य राहील.त्यांना निधी, सुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे मत महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यापीठाचा 14 वा वर्धापन दिन बुधवारी सकाळी 11 वाजता महापौर   बनशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम घेऊन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक बी.  पी. पाटील, वित्त व लेखाधिकारी बी. सी. शेवाळे, जीवन गौरव पुरस्कारप्राप्त पुरणचंद्र पुंजाल यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ गीत गायले. विद्यापीठाच्या 482 एकर जागेत विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते केले.

महापौर बनशेट्टी पुढे म्हणाल्या, विद्यापीठाने तेलुगु आणि कन्नड भाषकांसाठी रोजगार मिळण्याच्यादृष्टीने अभ्यासक्रम सुरू करावेत. अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले इमारतीचे भूमिपूजन सध्या झाले आहे. विद्यापीठाच्या विकासाची सुरूवात झाली आहे. यासाठी विद्यापीठातील सर्वांचे योगदान आहे. त्याही पुढे जाऊन कौशल्यावर आधारीत आणि रोजगाराभिमुख कोर्स विद्यापीठांतर्गत सुरू करणार आहे.सोलापूरकरांचे विद्यापीठ असल्याने येथील नागरिक, सेवाभावी संस्था, उद्योगपती विद्यापीठास सहकार्य करण्यासाठी स्वत:हून पुढे येत आहेत, जी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

प्रास्ताविक कुलसचिव डॉ. मंझा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रभाकर कोळेकर आणि प्रा. तेजस्वीनी कांबळे यांनी केले. आभार डॉ. व्ही. बी. पाटील यांनी मानले. विद्यापीठातर्फे प्राचार्य, कर्मचारी, महाविद्यालयांना यावेळी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 

विद्यापीठाचे इतर पुरस्कार : ज्यामध्ये गुणवंत कर्मचारी पुरस्कार-अजितकुमार संगवे, वालचंद महाविद्यालय. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार-लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय. उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण)-डॉ. कैलास करांडे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (शहरी) डॉ. महिबूब दलाल, सोशल महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (ग्रामीण) डॉ. विकास कदम, केबीपी कॉलेज, पंढरपूर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (शहरी) डॉ. सचिन गेंगजे, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुणवंत शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ शैक्षणिक संकुल) डॉ. विकास पाटील, पदार्थ विज्ञान संकुल.