होमपेज › Solapur › तेलंगणामध्ये सोलापूरचे कारखानदार उभारणार टेक्स्टाईल पार्क

तेलंगणामध्ये सोलापूरचे कारखानदार उभारणार टेक्स्टाईल पार्क

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:28PM सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापुरातील 330 कारखानदारांनी तेलंगणामधील मिनी टेक्स्टाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका बैठकीत जनगम जिल्ह्यातील चिन्नपेंड्याल येथे या पार्कसाठी 117 एकर जागा उपलब्ध करुन देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. 

एकेकाळी सोलापुरात मोठी आर्थिक उलाढाल करणारा यंत्रमाग अर्थात टेक्स्टाईल उद्योग अनेक कारणांमुळे अडचणीत सापडला. परिणामी या उद्योगाची उलाढाल कमी होत गेली. 24 हजार इतक्या संख्येने असलेल्या यंत्रमागाची संख्या घटून 16 हजारांवर आली. हा उद्योग करणारे तेलुगु विणकर बांधव हे मूळचे तेलंगणाचे आहेत. अलीकडे यंत्रमाग चक्क भंगारात विकण्याचे प्रमाण वाढल्याने या उद्योगाची स्थिती दयनीय अशी झाली आहे. राजकीय उदासीनतेमुळे या उद्योगाला कोणी वाली नाही, अशी स्थिती उद्भवली असताना चार महिन्यांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मूळ तेलंगणाचे व सध्या सोलापूर, भिवंडी, सुरत येथे स्थायिक असलेल्या बांधवांना टेक्स्टाईल उद्योगासाठी तेलंगणाला परत येण्याचे आवाहन केले होते. 

वरंगल जिल्ह्यात काकतिया नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी करण्यात येत असून यामध्ये सोलापूर, भिवंडी, सुरत येथील बांधवांनी सामील झाल्यास त्यांना अनेक सोयी-सुविधा, विविध सवलतीच्या योजना उपलब्ध करुन देऊ, असा के. चंद्रशेखर राव यांचा प्रस्ताव आहे. याबाबत सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी सकारात्मक विचार करुन तेलंगणा स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांसमवेत गाठीभेटी केल्या. मडीकोंडा टेक्स्टाईल पार्कचे प्रेसिडेंट डी. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे यंत्रमागधारक राजेशम चिलका, मनोहर सिंगम, कनकय्या भैरी, देविदास इट्टम यांनी प्रयत्न केले. काकतिया पार्कमध्ये अपेक्षित असलेली मोठी गुंतवणूक आम्हाला परवडणारी नसल्याने तेलंगणा सरकारने आम्हाला कमी गुंतवणुकीला अनुकूल अशी मिनी टेक्स्टाईल पार्कची योजना राबविण्याची विनंती सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी केली. याबाबत 2 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे तेलंगणा स्टेट इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनची  यंत्रमागधारकांसमवेत बैठक झाली.  यंत्रमागधारकांच्या टेक्स्टाईल पार्कसाठी जनगम जिल्ह्यातील चिन्नपेंड्याल येथे या पार्कसाठी 117 एकर जागा उपलब्ध करुन देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली.  यावेळी कॉर्पोरेशनचे चेअरमन बालमल्लू गॅदरी, व्यवस्थापकीय संचालक नरसिंह रेड्डी,  मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसूदन राव, वस्त्रोद्योग संचालक श्रीनिवास रेड्डी,  सरव्यवस्थापक गितांजली आदी उपस्थित होते. 

330 जणांनी पार्कसाठी केले अर्ज : सिंगम 
‘केसीआर’ यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोलापुरातील 330 यंत्रमागधारकांनी तेलंगणामधील प्रस्तावित मिनी टेक्स्टाईल पार्कमध्ये सहभागी होण्यासाठी तेथील इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनकडे अर्ज केले आहेत. या पार्कमध्ये विविध सोयी-सवलती मिळणार आहेत, अशी माहिती सोलापुरातील यंत्रमागधारक मनोहर सिंगम यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.