Tue, Jul 07, 2020 11:53होमपेज › Solapur › टेंभुर्णीत जीपच्या धडकेत दोघे जागीच ठार

टेंभुर्णीत जीपच्या धडकेत दोघे जागीच ठार

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 11:07PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्यावर भरधाव  स्कॉर्पिओ जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले; तर पाच वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात टेंभुर्णीतील लोंढे वस्तीवरील प्राथमिक शाळेजवळ सायंकाळी 5.15 च्या दरम्यान झाला.

नारायण केरू अंधारे (वय 48) व राजेंद्र कृष्णा इंगळे (59, दोघेही रा. इंगळे वस्ती कुर्डु, ता. माढा) अशी मृतांची नावे आहेत. आरती सुभाष इंदलकर (5, रा. चव्हाणवाडी, ता. माढा) असे जखमी बालिकेचे नाव आहे.

नारायण अंधारे व राजेंद्र इंगळे हे रूई (ता. माढा) येथील म्हसोबा देवस्थान येथे होरो-होंडा मोटारसायकलवर (क्र.एम.एच.13-वाय-547) गेले होते. ते टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्यावर लोंढे वस्ती शाळेजवळ आरती इंदलकर या चिमुरडीस तिच्या पित्याकडे सोडण्यासाठी महामार्गावरून वळत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेने दुचाकीवरील सर्व जण उंच हवेत उडून रस्त्यावर आपटले. या अपघातात अंधारे व इंगळे गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमी आरती इंदलकर ही सुदैवाने वाचली आहे.सुभाष इंदलकर यांचे घटनास्थळापासून जवळच हॉटेल असून त्यांच्या हॉटेल समोरच अपघात घडला आहे. या हॉटेलमध्ये आरती हिस तिच्या वडिलांकडे सोपवून ते दोघे पुढे कुर्डु गावी जाणार होते. अपघातास कारणीभूत ठरलेला करड्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात निघून गेली. काही जणांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही.