Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Solapur › तलाठी मारहाणप्रकरणी  महिलेस न्यायालयीन कोठडी

तलाठी मारहाणप्रकरणी  महिलेस न्यायालयीन कोठडी

Published On: Mar 25 2018 1:40AM | Last Updated: Mar 24 2018 10:29PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

माढा तालुक्यातील उपळवाटे येथील तलाठी मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अलका गायकवाड हिला शनिवारी अटक करण्यात आली. तिला माढा न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उपळवाटे येथे 16 मार्च रोजी सकाळी गाव कामगार तलाठी जी. वाय. ढोकणे यांना जमिनीची नोंद  रोखून धरल्याच्या रागावरून त्यांना उपळवाटे येथील प्रहार संघटनेची अध्यक्षा अलका नागनाथ गायकवाड, मुलगा शुभम नागनाथ गायकवाड यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे ज्ञानेश्‍वर वसंत गायकवाड याने व्हिडीओ चित्रीकरण केले होते.  

यावरून तलाठी ढोकणे यांनी या तिघांविरोधात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  दरम्यान, शासकीय कर्मचार्‍यांवर सतत होणार्‍या मारहाणीच्या घटनेने व्यथित झालेल्या जिल्हा तलाठी संघटनेने या घटनेतील आरोपीस अटक  होत नाही, तोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले होते. या घटनेने शासकीय कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले होते.

तलाठी संघटनेच्या कामबंद आंदोलनास राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना याच्यासह अन्य संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनाही निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कामबंद आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या होत्या. तर मारहाण करणारे फरार झाल्यामुळे पोलिस यंत्रणेवर  मोठा ताण आला होता.

या घटनेतील दोन मुलांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी ही फरार होती. अटक केलेल्यांना जामीन होत नसल्याचे लक्षात येताच मुख्य आरोपी महिला ही शनिवारी टेंभुर्णी पोलिसांना शरण आली. यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोसई पी.के. मस्के यांनी अलका गायकवाडला रितसर अटक करून माढा न्यायालयासमोर उभे केले असता तिला न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 

 

 

tags : Temburi,news, talathi, fighting, case, Alka, Gaikwad, arrested,