Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Solapur › टेंभुर्णीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी मुंबईत लाक्षणिक उपोषण

टेंभुर्णीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी मुंबईत लाक्षणिक उपोषण

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 21 2018 12:12AM टेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी गेल्या एक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार हे पाठपुरावा करीत असून या मागणीसाठी 14 मार्च रोजी त्यांनी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करुन मागणीचे पत्र आरोग्य मंत्री यांना दिले आहे. आरोग्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत मागणी मान्य न झाल्यास पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

टेंभुर्णी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या केंद्रावर टेंभुर्णी शहरासह परिसरातील छत्तीस गावे अवलंबून आहेत. आरोग्य केंद्र छोटे असल्याने व पुरेशा सुविधा नसल्याने आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था आरोग्य केंद्राची झाली आहे.त्यातच नेहमी औषधांचा तुटवडा, सिजर सोय नाही, कायमस्वरूपी डॉक्टर, कमी कर्मचारी यामुळे नेहमी आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना या असुविधांचा सामना करावा लागतो. महामार्गाचे जाळे असल्याने येथे जखमींना योग्य प्राथमिक उपचार मिळत नाहीत. यामुळे अनेक जखमी व गंभीर रुग्ण परगावी दवाखान्यात नेईपर्यंत दगावतात. 

टेंभुर्णीमध्ये उपजिल्हा रुग्णालय झाल्यास टेंभुर्णीसह सापटणे, तांबवे, दहिवली, अकोले खुर्द, उपळवाटे, कन्हेरगाव, वेणेेगाव, अकोले बुद्रुक, आहेरगाव, भुईंजे, बेंबळे, घोटी, चव्हाणवाडी, फुटजवळगाव,  मिटकलवाडी, शेवरे, नगोर्ली, शिराळ आदी 30-35 या गावांना लाभ होईल.टेंभुर्णीसारखे तीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करीत आहोत. 

उपोषणस्थळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना मागणी मान्य करण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले. आ. बच्चू कडू यांनी पुढील अधिवेशनापर्यंत मागणी मान्य न झाल्यास अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. उपोषणापूर्वी सोलापूर येथील सिव्हिल सर्जन यांनी येथील प्राथमिक केंद्रात येऊन सर्व माहिती जाणून घेतली होती, असे जहागिरदार यांनी सांगितले आहे.

उपोषणासाठी अनिल उत्तम जगताप, रणधिर जगताप, तानाजी मुसळे, अक्षय धोत्रे, गणेश मुलाणी, सोमनाथ चव्हाण, संतोष सोनवणे, सागर जगताप, भैय्या माने, किरण चव्हाण, किशोर साळुंखे, नितीन चौगुले, संतोष लोंढे, निशांत खरात, हणमंत चव्हाण, मोहन गायकवाड, सूरज धोत्रे, जहांगीर काझी आदी उपोषणास बसले होते. तसेच प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मस्के-पाटील व अमोल जगदाळे यांनी पाठिंबा दिला होता.
 

Tags : Tembhurni Citizens, Mumbai, Protests,  sub district hospital,  Solapur District, Narayan Rane